news
Home पिंपरी चिंचवड मराठी साहित्य अन् रंगभूमीतील अजोड योगदानाचा पिंपरी महापालिकेकडून सार्थ सन्मान; रमेश वाकनीस यांना मानपत्र बहाल

मराठी साहित्य अन् रंगभूमीतील अजोड योगदानाचा पिंपरी महापालिकेकडून सार्थ सन्मान; रमेश वाकनीस यांना मानपत्र बहाल

पाली भाषेतील 'धम्मपद' काव्यानुवादासह नाट्यक्षेत्रातील कामगिरीची दखल; पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडल्याची महापौरांची भावना | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी रमेश वाकनीस यांचा भव्य नागरी सत्कार; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान!

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले दि. २७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराच्या साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या बहुआयामी कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला.

शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घालणाऱ्या आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. याच धोरणांतर्गत आयोजित विशेष सोहळ्यात रमेश वाकनीस यांना हा मानाचा नागरी सत्कार प्रदान करण्यात आला. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानपत्राचे वाचन केले.

या गरिमापूर्ण सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, राजू मिसाळ, शैलजा मोरे, अमित गावडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश वाकनीस यांनी कवी, लेखक, नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक म्हणून मराठी साहित्य आणि रंगभूमीवर आपली स्वतंत्र व भक्कम ओळख निर्माण केली आहे. गाजलेले कवितासंग्रह “पूर” आणि “आकाशा आणि काही कविता” , गाजलेली नाटके “ओळखावा धोंडा अंतरीचा” आणि “कहाणी अखेरच्या संपाची”, प्राचीन पाली भाषेतील ‘धम्मपद’ या धर्मग्रंथाचा अत्यंत प्रभावी मराठी काव्यानुवाद करून त्यांनी साहित्य आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणला आहे. रंगभूमीवरील अष्टपैलू अभिनय, दिग्दर्शन आणि बालनाटकांच्या माध्यमातून नव्या पिढीवर कलासंस्कार रुजविण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. समाजप्रबोधनाची जोड देत मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करणाऱ्या त्यांच्या या योगदानाचा महापालिकेने सार्थ सन्मान केला.

“रमेश वाकनीस यांनी साहित्य, नाटक, अभिनय, दिग्दर्शन आणि संस्कृती संवर्धन या सर्वच क्षेत्रांत अजोड कार्य करून पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात भर पाडली आहे. त्यांचे संवेदनशील लेखन, प्रभावी रंगकर्म आणि समाजाभिमुख दृष्टिकोन पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवाला समृद्ध करणारा आहे. अशा अष्टपैलू कलावंताचा महापालिकेच्या व्यासपीठावर गौरव करणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे.”

रवि लांडगे, महापौर (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!