news
गोडाऊन चौक ते वाकडदरम्यान धावणार रबर टायरींची ‘इलेक्ट्रिक बस मेट्रो’; २४० प्रवाशांची क्षमता अन् प्रदूषणमुक्त प्रवासनिवडणूक आयोगाच्या अभियानात १००% सहभागासाठी पिंपरी पालिका प्रशासनाचे कठोर पाऊल; अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोहोच सादर करणे अनिवार्य‘नीट’ गोंधळामुळे गमावला आत्मविश्वास; आमदार रोहित पवार यांच्याकडून अंकिता सांगळेला श्रद्धांजलीसार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राचा मोठा निधी; इमारत, ग्रंथ खरेदी अन् बालकोपऱ्यासाठी मिळणार मदतआमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश; जेएनएनयुआरएम व ईडब्ल्यूएस पुनर्वसन योजनांना मालमत्ता करात सवलतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार
Home पिंपरी चिंचवड महिलांची सुरक्षा अन् सन्मान ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन

महिलांची सुरक्षा अन् सन्मान ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा विशेष पुढाकार; राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय कार्यशाळेला उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“शक्ती आणि सुरक्षा”: महिलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांवर मात करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न!

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले दि. २७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी, वेगवान, तंत्रशुद्ध आणि आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय महिला आयोग (NCW), अतिरिक्त पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग (महाराष्ट्र राज्य) आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने “शक्ती आणि सुरक्षा: सायबर गुन्ह्यांविरुद्ध पोलिसिंग” या विषयावर आधारित ही कार्यशाळा डी. वाय. पाटील कॉलेज येथे पार पडली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. सौ. विजया रहाटकर यांच्या शुभहस्ते झाले.

या प्रसंगी कौटुंबिक न्यायालय मुंबईच्या माजी प्रधान न्यायाधीश स्वाती चौहान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पिंपरी-चिंचवडचे सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संजय दराडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त सारंग आवड, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह आदी वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, “महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही समाजाची आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांशी पोलिसांनी आदरपूर्वक व सौजन्याने वागले पाहिजे. त्यांची तक्रार तात्काळ ऐकून घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.” माजी प्रधान न्यायाधीश स्वाती चौहान यांनी महिला, पुरुष आणि तृतीयपंथी यांच्याबाबत समान दृष्टिकोन ठेवून तपास कसा करावा यावर मार्गदर्शन केले. आयजी ब्रिजेश सिंह यांनी महिलांना प्रभावित करणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, धोके आणि महिलांनी स्वतःचे रक्षण कसे करावे यावर प्रकाश टाकला. तसेच संजय तुंगार व सागर पानमंद यांनी आधुनिक तपास तंत्र व डिजिटल फॉरेन्सिकबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. डॉ. उमा सुब्रमण्यम यांनी पीडित व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून संवेदनशीलतेने तपास करण्यावर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, सोलापूर शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीण या भागांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी व तपास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या तपासाची गुणवत्ता उंचावून पीडितांना जलद व प्रभावी न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवड, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्वयक सर्वेश पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!