पिंपरी-चिंचवडच्या दळणवळणात क्रांती; ‘HCMTTR’ आणि ‘e-RTS’ प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , दि. २८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे/पिंपरी-चिंचवड: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाचा ताण लक्षात घेऊन, भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रवाशाभिमुख करण्यासाठी एचसीएमटीआर (HCMTTR – High Capacity Mass Transit Route) आणि ई-आरटीएस (e-RTS – Electric Rapid Transit System) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाच्या प्रायोगिक टप्प्याला मान्यता देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘ई-आरटीएस’ प्रणालीचे संगणकीय सादरीकरण केले. ही प्रणाली मेट्रोप्रमाणेच अत्यंत वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असेल. रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांवर ही सिस्टीम आधारित आहे. एका वाहनात २४० हून अधिक प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग महामेट्रोच्या सहकार्याने १ ते १.५ वर्षांत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
प्रस्तावित प्रायोगिक मार्ग:
गोडाऊन चौक ➔ कुदळवाडी चौक ➔ ऑटो क्लस्टर ➔ काळेवाडी फाटा ➔ जगताप डेअरी चौक ➔ वाकड
हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर एचसीएमटीआर व शहरातील सर्व बीआरटी मार्गांवर ई-आरटीएस प्रणालीचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल. तसेच शहरातील सर्व मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर वाहतूक व्यवस्थांशी ही प्रणाली जोडली जाणार आहे.
सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे स्वागत करत प्रकल्पास मंजुरी दिली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करावा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
“पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर आणि ई-आरटीएस या एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची संकल्पना मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडली. मेट्रो, बीआरटी आणि इतर वाहतूक यंत्रणांना जोडणारी, पर्यावरणपूरक आणि प्रवाशाभिमुख अशी ही प्रणाली असेल. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिका या प्रकल्पाची नियोजनबद्ध आणि वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

