विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR): पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नोंदणी न केल्यास पुढील महिन्याचे वेतन रोखणार; महापालिका प्रशासनाचा कडक इशारा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
भारत निवडणूक आयोगामार्फत सध्या राज्यभरात विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR 2026) राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील पात्र सदस्यांची नोंदणी (Enumeration) अनिवार्यपणे पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. ही नोंदणी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्याचे वेतन रोखले जाईल, असा थेट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त (३) विक्रांत बगाडे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत परिपत्रक (जा.क्र. साप्रवि/२/कावि/३१९/२०२६) जारी करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची ‘Enumeration Form’ भरून नोंदणी तातडीने पूर्ण करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारी पोहोच (Acknowledgement/Receipt) संबंधित विभागप्रमुख किंवा आहरण व वितरण अधिकाऱ्याकडे जमा करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत नोंदणीची पोहोच जमा न करणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जाईल. अशा कर्मचाऱ्यांना आवश्यक पोहोच सादर करेपर्यंत पुढील महिन्याचे वेतन दिले जाणार नाही. सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांनी आपापल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांकडून पोहोच प्राप्त करून त्याची नोंद ठेवावी आणि त्याचा अनुपालन अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. आदेशांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या या अत्यंत महत्त्वाच्या अभियानात महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा १००% सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
