news
Home पुणे ‘कष्ट हेच खरे वैभव’; संत रोहिदासांच्या विचारातून भारतभरात ६५१ कार्यक्रमांचा संकल्प

‘कष्ट हेच खरे वैभव’; संत रोहिदासांच्या विचारातून भारतभरात ६५१ कार्यक्रमांचा संकल्प

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कीर्तन-प्रवचन महोत्सव संपन्न; माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन अन् मान्यवरांचा सन्मान | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“संत रोहिदास महाराज हे स्वातंत्र्य, समता व श्रमप्रतिष्ठेचे चिरंतन दीपस्तंभ” — रवींद्र किरकोळे

पुणे/पिंपरी, प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान  दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: “संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांनी तत्कालीन विषम सामाजिक व्यवस्थेतील वेदनांना निराशेचे रूप न देता त्या आपल्या वाणीचे, विचारांचे आणि भक्तीचे सामर्थ्य बनविले. त्यांच्या शब्दांतून केवळ एका संताचे जीवन व्यक्त होत नाही, तर शोषित, वंचित आणि श्रमजीवी समाजाच्या वेदनांना आवाज मिळतो. त्यांनी श्रमाला ईश्वरपूजेचे स्थान दिले आणि ‘कष्ट हेच खरे वैभव’ हा जीवनमंत्र जगासमोर ठेवला. त्यामुळे संत रोहिदास महाराज हे श्रमप्रतिष्ठेचे चिरंतन प्रतीक ठरले,” असे प्रभावी प्रतिपादन अखिल भारतीय समरसता गतिविधीचे सहसंयोजक रवींद्र किरकोळे यांनी केले.

श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास, पुणे (महाराष्ट्र) यांच्या वतीने संत शिरोमणी सद्गुरू श्री रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन–प्रवचन–व्याख्यान महोत्सव आणि ‘६५१ पुष्प समर्पण अभियान’ संकल्प समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

रवींद्र किरकोळे पुढे म्हणाले, “संत रोहिदास महाराजांच्या दृष्टीने माणसाचे मोठेपण जन्मावर किंवा जातिव्यवस्थेवर नव्हे, तर कर्म, चारित्र्य आणि अंतःकरणाच्या निर्मळतेवर अवलंबून होते. त्यांनी भक्तीला समता, मानवता आणि आत्मसन्मानाची दिशा दिली. पारतंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध स्वातंत्र्याचा पहिला निर्भय स्वर त्यांच्या वाणीतून उमटला. ‘जो पारतंत्र्यात राहतो, तो उपवासालाच पात्र ठरतो’ या विचारामधून त्यांनी मानवी प्रतिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.”

कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांच्या भावस्पर्शी कीर्तनाने झाली. समरसता गतिविधीचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्र सदस्य निलेश गद्रे यांनी प्रास्ताविक केले, तर ॲड. आनंद गवळी यांनी संत रोहिदासांच्या विचारांचे समकालीन संदर्भांसह विशेष मार्गदर्शन केले.

या सोहळ्याच्या व्यासपीठावर ॲड. आनंद गवळी, ह.भ.प. मोरेश्वर जोशी आणि मुकुंद आफळे उपस्थित होते. तसेच विलास लांडगे, रवी ननावरे, गीतेश जोशी, डॉ. प्रसाद खंडागळे, आबा देशपांडे, अनिल भस्मे, गोरख शिंदे, विलास लांडगे, दत्ता वाळवेकर, राजेश मठपती, शरद शिंदे, ॲड. मुकुंद यदमळ, डॉ. माणिक सोनावणे, धनंजय खुडे, शुभांगी पोटभरे, प्रमोद पोटभरे, स्मिता देशपांडे, विलास देशपांडे, विकास माने, सुरेश महाले, प्रतिभा कुलकर्णी, ॲड. एकनाथ जावीर या सर्व मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

या प्रसंगी संत रोहिदास महाराजांवरील माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कार्यकारी मंडळ, कीर्तनकार आणि चरणसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनंजय भिसे यांनी केले, तर आभार मुकुंद आफळे यांनी मानले.

भारतभरात संत रोहिदास महाराज यांच्या जीवन व कार्यावर कीर्तन, प्रवचन व व्याख्यानांच्या माध्यमातून ६५१ कार्यक्रमांचा संकल्प सोडण्यात आला आहे. या माध्यमातून समता, श्रमप्रतिष्ठा, बंधुता, स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

“संत रोहिदास महाराजांनी मोगलांच्या काळातील धर्मांतराच्या प्रवृत्तीला निर्भीडपणे विरोध करत स्वधर्म आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. त्यांच्या पवित्र रचनांना शीख धर्माच्या ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांनी कर्मकांड आणि जातिभेदाला विरोध करून निर्मळ भक्तीला अध्यात्माचे अधिष्ठान मानले.”

निलेश गद्रे (सदस्य, समरसता मंच – महाराष्ट्र व गोवा)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!