बांधकाम कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती योजना पूर्ववत सुरू करा; कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे कामगार मंत्र्यांना साकडे!
मुंबई/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबवली जाणारी अत्यंत महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना आणि इतर कल्याणकारी योजना अचानक बंद करण्याचा शासन निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि कामगारविरोधी आहे. ही योजना तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे.
या गंभीर प्रश्नावर काशिनाथ नखाते यांनी मुंबई येथे कामगार मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर करून लाखो कामगार पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडला.
महाराष्ट्रातील लाखो कष्टकरी व बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता पहिलीपासून ते पदवी व उच्च शिक्षणापर्यंत ही शिष्यवृत्ती दिली जात होती. यामुळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणाची मोठी ऊब मिळत होती. याशिवाय गृहअनुदान, गृहकर्जावरील व्याज अनुदान आणि मुलीच्या विवाहासाठी दिले जाणारे आर्थिक सहाय्य या योजनांमुळे कामगारांना मोठा सामाजिक आधार मिळाला होता.
मात्र, अचानक या सर्व कल्याणकारी योजना बंद किंवा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरातील लाखो कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
यावेळी बोलताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की:
“शासनाने इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना केवळ मूलभूत शैक्षणिक वस्तूंचा संच देण्याचे नियोजन केले आहे, जे अत्यंत तोकडे आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शैक्षणिक खर्च लक्षात घेऊन शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून ती मूळ योजनाच कायम ठेवणे अधिक उपयुक्त आणि न्यायाचे ठरेल. थेट आर्थिक शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खरी मदत होते. ही योजना बंद केल्यास कामगार मंडळात नोंदणी व नूतनीकरण करणे सोडून देतील, ज्यामुळे संपूर्ण कल्याणकारी चौकटीचाच बोजवारा उडेल.”
कष्टकरी कामगारांच्या या हक्काच्या मागण्यांसाठी काशिनाथ नखाते यांनी संघर्षाची भूमिका घेतली असून, गरज पडल्यास राज्यभरात कामगारांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या बैठकीत केवळ शिष्यवृत्तीच नव्हे तर इतरही ज्वलंत कामगार प्रश्नांवर आक्रमक चर्चा करण्यात आली. कंत्राटी कामगारांचे किमान वेतन निश्चित करणे. नवीन श्रम संहितेतील (Labor Codes) कामगारविरोधी कलमांचा पुनर्विचार. घरेलू कामगार मंडळाची नोंदणी पूर्ववत गतिमान करणे. विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ प्रत्यक्ष तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचवणे. याप्रसंगी कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक लाला राठोड आणि विजय कदम प्रमुख उपस्थित होते.
कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मांडलेली बाजू आणि कामगार पाल्यांचा विचार करता, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याप्रकरणी तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
“शिष्यवृत्ती योजना, विवाह अनुदान तसेच नवीन श्रम संहितेनुसार कामगारांसाठी आवश्यक सुधारणांचा समावेश करण्याबाबत संबंधित उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन कामगार मंत्र्यांनी प्रतिनिधीमंडळाला दिले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
