ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आणि विचारांचे विद्यापीठ; पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ यांचा नागरी सत्कार!
सांगवी/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: अनुभव, ज्ञान आणि संस्कारांची श्रीमंती जपणारे ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आणि विचारांचे विद्यापीठ असतात. याच ज्येष्ठांच्या आनंदी, समृद्ध आणि सन्मानजनक आयुष्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वृषालीताई मरळ यांचा सांगवी येथे नागरी सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघ (सांगवी परिसर) आणि संत सावतामाळी उद्यान येथे आयोजित जुलै व ऑगस्ट महिन्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमयी वाढदिवस सोहळ्यात त्या बोलत होत्या. “पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, निवृत्ती वेतन, आरोग्यविषयक समस्या आणि सोयी-सुविधा सोडवण्यासाठी महासंघ पूर्ण ताकदीने आणि कटिबद्धतेने कार्य करेल,” अशी ग्वाही वृषालीताई मरळ यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी सांगवी परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ विभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तृप्तीताई कांबळे (नगरसेविका)नी सर्व ज्येष्ठ महिलांनी परिधान केलेल्या एकसारख्या पारंपरिक साड्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. नवी सांगवी येथील श्री गणेश सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जवाहर ढोरे (स्थानिक पदाधिकारी) यांचा सत्कार करण्यात आला. ३. ह. भ. प. बंडोपंत शेळके (माजी अध्यक्ष): उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत आणि आदेश बांदेकर यांच्या हस्ते “वारकरी भूषण पुरस्कार” मिळाल्याबद्दल संघाच्या वतीने ह. भ. प. बंडोपंत शेळके (माजी अध्यक्ष) यांचा विशेष गौरव करण्यात आला.
आपल्या मनोगतात अध्यक्षा वृषालीताई मरळ म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १७५ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत असून तब्बल ४० हजार ज्येष्ठ सभासदांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महासंघाच्या वतीने लवकरच पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती ज्येष्ठ महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात सांगवीच्या महिला भजनी मंडळाला विशेष निमंत्रित केले जाईल.
संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ९ मे १९९७ रोजी डॉ. श्रीराम पांडे यांनी स्थापन केलेला सांगवीतील हा सर्वात जुना आणि सक्रिय संघ आहे. येथे केवळ वाढदिवस नव्हे तर आरोग्य तपासणी शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य निर्माण केले जाते.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेल्या ज्येष्ठ महिला भजनी मंडळाची सुरुवात केल्याबद्दल ह. भ. प. रामदास कामठे काका व सुभद्राताई कामठे यांचा “गुरुपूजन” करून आदर सत्कार करण्यात आला. त्यानंतर महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. या भजनाला हार्मोनियमवर ह. भ. प. कामठे दादा आणि पखवाजवर रोहिदास ठाकर यांनी सुरेल साथ दिली.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जन्मदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठ सभासदांचा उपरणे व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला तब्बल १०० हून अधिक स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिक उत्साहाने उपस्थित होते.
या कौटुंबिक व आत्मीय सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव, सचिव सुरेंद्र शेळके, कोषाध्यक्ष शिवाजी बंडगर, सदस्य गोपाळ गाढवे, स्वीकृत सदस्य सुनील पोकरे तसेच महिला भजनी मंडळाच्या आयोजक अनिता गाढवे, कल्पना देगांवकर व रेखाताई गोरे यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुरेंद्र शेळके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कार्याध्यक्ष विष्णु झाजुर्डे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



