घरगुती कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे व्यापक जनजागृती अभियान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत (Waste Segregation) व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. घरातून निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार स्वतंत्र प्रकारांत वेगळा करूनच महापालिकेच्या घंटागाडीत देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या विशेष अभियानांतर्गत शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात महापालिकेची पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व प्रत्यक्ष समजावून सांगत आहेत. तसेच विविध सोसायट्या, वस्त्या आणि सार्वजनिक ठिकाणी थेट संवाद साधून मार्गदर्शन केले जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार प्रत्येक नागरिकाने स्त्रोतस्थळीच (घरातच) कचऱ्याचे विलगीकरण करणे बंधनकारक आहे. ओला कचरा: जैविक प्रक्रियेसाठी आणि खतनिर्मितीसाठी, सुका कचरा पुनर्वापरासाठी (Recycling), सॅनिटरी कचरा आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी स्वतंत्र विल्हेवाट, विशेष काळजीयोग्य कचरा घातक व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन, कचरा असा चार प्रकारांत स्वतंत्रपणे जमा केल्यास त्यावर प्रक्रिया करणे अत्यंत सुलभ होते. यामुळे पुनर्वापराला चालना मिळून लँडफिल (Landfill) वर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.
“स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक घरातून कचऱ्याचे चार प्रकारांत योग्य विलगीकरण झाल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करावे.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“स्रोतस्थळी कचरा विलगीकरण हा शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा मूलभूत टप्पा आहे. ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे दिल्यास कचरा प्रक्रियेला गती मिळते आणि स्वच्छ शहराच्या उद्दिष्टपूर्तीस मदत होते.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात नागरिकांशी थेट संवाद साधून कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर आमचा भर आहे.”
— कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“घरातूनच कचऱ्याचे योग्य विलगीकरण केल्यास त्यावरील प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक होते. पर्यावरण संरक्षण तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने कचरा चार प्रकारांत वेगळा करून द्यावा.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उप-आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महापालिकेच्या या पर्यावरणपूरक मोहिमेला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित पिंपरी-चिंचवड’ घडवण्यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने कटिबद्ध आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

