news
Home पिंपरी चिंचवड डिजिटल क्रांती! ५५६ कोटींपैकी ५१२ कोटींचा कर ऑनलाईन जमा; उपायुक्त सचिन पवार यांच्या नियोजनाचे यश

डिजिटल क्रांती! ५५६ कोटींपैकी ५१२ कोटींचा कर ऑनलाईन जमा; उपायुक्त सचिन पवार यांच्या नियोजनाचे यश

४ लाखांहून अधिक मिळकतधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वेळेत कर भरण्याचे महापौर, आयुक्त अन् उपायुक्तांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर संकलनात नवा विक्रम; ४ ऑगस्टपर्यंत तब्बल ५५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात कामगिरीचा नवा उच्चांक गाठला आहे. १ एप्रिल २०२६ ते ४ ऑगस्ट २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत) या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ५५६ कोटी ८४ लाख ३४ हजार ७२९ रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे.

विशेष म्हणजे, उपायुक्त सचिन पवार यांनी कर संकलन विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून विभागाच्या कामकाजात अभूतपूर्व सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्यांच्या पारदर्शक, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध कारभारामुळेच कर संकलनाच्या गतीला आणि पारदर्शकतेला मोठी चालना मिळाली असल्याचे चित्र प्रशासनात व नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

यंदा कर भरण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या ऑनलाईन सुविधेला अभूतपूर्व पसंती दिली आहे. एकूण जमा झालेल्या ५५६ कोटी रुपयांच्या करांपैकी ५१२ कोटी ७७ लाख ९८ हजार ७०८ रुपये (तब्बल ९२% पेक्षा जास्त) रक्कम ऑनलाईन माध्यमातून जमा झाली आहे.

तर ऑफलाइन माध्यमातून ४४ कोटी ६ लाख ३६ हजार २१ रुपये जमा झाले आहेत. यामध्ये रोखीद्वारे (Cash) २३ कोटी ८५ लाख ७० हजार १२२ रुपये, धनादेशाद्वारे (Cheque)  १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ५७२ रुपये, डिमांड ड्राफ्टद्वारे (DD) १ कोटी ७६ लाख ९८ हजार ३२७ रुपये जमा झाले आहेत.

शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र आणि मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मालमत्ताधारकांपर्यंत वेळेत देयके पोहोचवणे आणि कर सवलतींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. परंतु, उपायुक्त सचिन पवार यांनी पदभार घेतल्यापासून कर संकलन प्रणाली सुटसुटीत केली, अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट उद्दिष्टे देऊन उत्तरदायी बनवले, तसेच तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे चार लाखांहून अधिक मिळकतधारकांनी अत्यंत सुलभतेने कर भरणा केला असून महापालिकेच्या महसुलात ऐतिहासिक वाढ झाली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कराचे वेळेवर संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर भरून विकासकामांप्रती आपली जबाबदारी पार पाडली आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन माध्यमातून कर भरण्यास नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा डिजिटल सेवांवरील विश्वासाचे द्योतक आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता कर भरून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे.”

रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

“महापालिकेच्या विकासकामांना आर्थिक बळ देण्यासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून विकास प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे, ही समाधानाची बाब आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.”

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

“चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ४ ऑगस्टपर्यंत ५५६ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित झाला आहे. त्यापैकी ५१२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन माध्यमातून जमा झाली आहे. यावरून नागरिकांचा डिजिटल माध्यमावरील वाढता विश्वास दिसून येतो. ज्या मिळकतधारकांनी अद्याप कर भरला नाही, तो त्यांनी तात्काळ भरावा.”

सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

उपायुक्त सचिन पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली कर संकलन विभागाने साध्य केलेल्या या यशाचे महापालिका वर्तुळात व नागरिकांमधून विशेष कौतुक केले जात आहे.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!