पिंपरी-चिंचवड शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी महापौर रवि लांडगे यांचा मोठा निर्णय; पार्किंग पॉलिसीची होणार प्रभावी अंमलबजावणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी अत्यंत दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित, आधुनिक आणि नागरिकाभिमुख बनवण्यासाठी पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्धार महापौरांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
शहरवासीयांना भेडसावणाऱ्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तत्परतेने आणि व्यवहार्य उपाययोजना शोधणारे नेतृत्व म्हणून महापौर रवि लांडगे यांची ओळख निर्माण झाली आहे. या बैठकीत त्यांनी विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेत भविष्यातील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह संबंधित विभागांचे उच्चाधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.
बैठकीत यापूर्वीच्या पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणी, तांत्रिक त्रुटी आणि त्यामागील कारणांवर सखोल चर्चा झाली. प्रमुख रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी क्षेत्रे, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांत नियोजनबद्ध पार्किंगची उभारणी केली जाईल. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा (Smart Parking System) वापर करून नागरिकांना उपलब्ध पार्किंगची माहिती सुलभतेने मिळेल याची व्यवस्था केली जाईल. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे (Presentation) शहराच्या विविध भागांतील सद्यस्थिती, उपलब्ध मोकळ्या जागा आणि भविष्यातील नियोजनाचा आराखडा महापौरांसमोर मांडला.
“पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध आणि कार्यक्षम बनविण्यासाठी प्रभावी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नागरिकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकाभिमुख आणि व्यवहार्य पार्किंग व्यवस्था उभारावी.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात अत्यंत कार्यक्षम, अभ्यासू आणि लोकाभिमुख कारभाराचा आदर्श वस्तुपाठ महापौर रवि लांडगे यांनी घालून दिला आहे. नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडित असणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नावर त्यांनी दाखवलेली ही सक्रियता व गांभीर्य पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा देणारे ठरणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
