चिंचवडगाव पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा दलाचा स्तुत्य उपक्रम; बोपेगावच्या रामराव पाटील विद्यालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचे वाटप!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: चिंचवडगाव पोलीस स्टेशनच्या ग्राम सुरक्षा दल व शांतता कमिटीच्या सदस्यांनी सामाजिक बांधीलकी जपत सातारा दौऱ्यादरम्यान एका अत्यंत स्तुत्य आणि आरोग्यविषयक उपक्रमाची अंमलबजावणी केली. वाई तालुक्यातील बोपेगाव येथील ‘किसनवीर शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान (कवठे)’ संचलित रामराव पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन भेट देण्यात आले.
ग्रामीण, डोंगराळ भाग आणि शेतकरी-शेतमजुरांच्या मुलींच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने ‘निर्मला’ हा बिग प्रोजेक्ट राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक सदस्य संतोष वाल्हेकर यांच्या पुढाकाराने मिस्तुबा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सीएसआर (CSR) निधी उपलब्ध झाला होता.
या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील ४० शाळांमध्ये सॅनिटरी पॅड मशिन्स वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. वाई येथील शेखर जाधव सर यांच्या विनंतीवरून बोपेगावच्या शाळेचा यात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रोटरियन प्रदीप वाल्हेकर व त्यांच्या टीमने या मागणीला तात्काळ मंजुरी दिली.
चिंचवडगाव पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा दलाचे प्रतिनिधी व शांतता कमिटीचे सदस्य सातारच्या दौऱ्यावर जात असताना, त्यांनी स्वतः हे मशीन बोपेगावच्या शाळेत पोहोचवले. शाळेत पोहोचल्यानंतर मुख्याध्यापक गणेश पांडुरंग धाडवे, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांचे मनापासून स्वागत व आदरसत्कार केला. याप्रसंगी उपस्थित सदस्यांनी शाळेतील विद्यार्थिनींना व शिक्षकांना मशीन वापराबाबत सविस्तर माहिती दिली आणि प्रात्यक्षिक (डेमो) दाखवले.
प्रवासादरम्यान टीमने ‘जानाई हॉटेल’ येथे अल्पोपहार घेतला. प्लास्टिक किंवा कागदाच्या ऐवजी संपूर्ण स्टीलच्या साहित्याचा वापर करणाऱ्या या हॉटेलचे कौतुक करताना सदस्यांना रोटरियन गणेश बोरा यांच्या ‘स्टील प्लेट बँक’ या पर्यावरणपूरक उपक्रमाची आठवण झाली. उपस्थितांनी हॉटेल मालकाचे या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल विशेष अभिनंदन केले.
हा संपूर्ण सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी चिंचवड पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा दलाचे सहकारी धनंजय कुलकर्णी, प्रकाश मिर्झापुरे, राकेश सायकर, उदय वाडेकर, मधुकर साठे आणि चालक जोतिराम काळे यांनी विशेष सहकार्य आणि अथक परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

