निगडी सेक्टर २२ मधील पूरप्रश्न आणि पीसीएमसी कॉलनीच्या दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक; महापौरांच्या पाहणी दौऱ्यानंतर तातडीने दुरुस्तीचे आश्वासन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील निगडी सेक्टर नंबर २२, संग्रामनगर झोपडपट्टी, श्रमिकनगर, राहुलनगर, फातिमा मस्जिद परिसर आणि १ ते १५ बिल्डिंग या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी घुसून नागरिकांचे अतोनात नुकसान होते. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि पीसीएमसी कॉलनीतील जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पुढाकाराने महापौर रवि लांडगे यांनी संबंधित परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
दरवर्षी पावसाळ्यात कॅन्टोन्मेंट आणि मिलिटरीच्या माळरानावरून येणारे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात, दुकानांत शिरते. यामुळे अन्नधान्य, कपडे व घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान होऊन नागरिकांना हाल सोसावे लागतात.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राहुलनगर ते निगडी स्मशानभूमीपर्यंत येणारे पावसाचे पाणी थेट स्मशानभूमीमागील नाल्याला जोडण्यासाठी मोठा पावसाळी नाला बांधण्यात यावा, अशी आग्रही मागणी मनसेच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली.
याचबरोबर, पीसीएमसी कॉलनीतील जीर्ण झालेल्या इमारतींबाबत महापालिकेने दिलेल्या नोटिसांचा विषयही स्थानिक नागरिकांनी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी महापौरांसमोर मांडला. या इमारतींची संपूर्ण दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्वतःच्या खर्चाने करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत महापौरांनी नागरिकांना दिलासा दिला आणि आश्वासन दिले की:
“पीसीएमसी कॉलनीतील सर्व जीर्ण इमारतींची आवश्यक दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तातडीने केली जाईल.”
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले – मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या पाहणी दौऱ्यात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी राजू केरप्पा गायकवाड, अक्षयजी करंडे, प्रबुद्ध कांबळे, शेहना हाजी शेख, अल्ताफ भाई शेख, नजीर भाई शेख, गणेश वाघमारे, मंगेश जाधव, चनालबाबी अल्ताफ शेख, रेखा सूर्यवंशी, दिपाली जाधव, रेखा भोसले, सुवर्णा सूर्यवंशी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन तात्काळ पाहणी दौरा केल्याबद्दल आणि दुरुस्तीचे आश्वासन दिल्याबद्दल सर्व स्थानिक नागरिकांनी महापौरांचे तसेच मनसे पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

