24
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विचारांना उजाळा; महाराष्ट्र अनिसचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ११ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अमरावती) आणि गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट (अमरावती) यांच्या संयुक्त विद्यमाने राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट येथे “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत विचार” या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विचारप्रबोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनाचा जागर करत हा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा मिशन ट्रस्ट (मुंबई) चे विश्वस्त स्व. बापूसाहेब देशमुख (नागरवाडी) यांच्या दुःखात निधनाबद्दल उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. सामाजिक व सेवाभावी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचे या वेळी स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र अनिस अमरावतीचे उपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ हे होते.
या परिसंवादात डॉ. शोभा गायकवाड, प्राचार्य अनिल प्रांजळे, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्रीधरराव डहाके, विवेकवाहिनी अमरावतीच्या जिल्हाकार्यवाह डॉ. मंदा नांदुरकर आणि गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे कोषाध्यक्ष रामदासजी सदार यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार मांडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि कुप्रथांविरोधात उभारलेला लढा, तसेच त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादी विचार आजच्या काळातही अंधश्रद्धामुक्त समाज घडवण्यासाठी कसा दिशादर्शक आहे, यावर वक्त्यांनी सखोल प्रकाश टाकला.
कार्यक्रमस्थळी आयोजित व्यसनमुक्ती प्रबोधन प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यसनांचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे घातक दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश यातून देण्यात आला. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पंचसूत्रीची अधिकृत मांडणी करून समितीच्या भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट करण्यात आली.
संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या यामध्ये पुरुषोत्तमराव गावंडे (अध्यक्ष, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ), प्रतिभा खापरे (महिला राजसत्ता आंदोलन व ग्रामगीताचार्य), बबिता वानखडे (महाराष्ट्र अनिस, अमरावती), डॉ. सिम्रेला देशमुख आणि सचिन वासनिक विविध मान्यवरांचा शाल व ‘अनिस’ अंक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डवरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी तर दिलीप लाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, ग्राहक पंचायतचे अशोक हांडे, जयंत पिहूलकर, श्रीकृष्णराव कुलट, देविदासजी कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संदीप हिवराले, आशिष देशमुख, दिगंबर मेश्राम, पल्लवी ढोले, विजया करोले, हेमंत उम्रटकर, मो. अफसर भाई, रेहमत शहा, व्यंकट खोब्रागडे यांच्यासह दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यसनमुक्तीचा संदेश देत या वर्धापन दिनाची सांगता करण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

