10
निगडी भुयारी मार्गातील स्वच्छता अन् सुरक्षेबाबत उपमहापौर शर्मिला बाबर आक्रमक; अधिकाऱ्यांना दिले थेट आदेश!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: निगडी येथील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या भुयारी मार्ग परिसरातील स्वच्छता, सुरक्षा आणि अतिक्रमणाच्या वाढत्या समस्यांची दखल घेत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी थेट मैदानावर उतरून पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी परिसरातील विविध प्रश्नांचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अस्वच्छतेवर मात करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.
भुयारी मार्ग परिसरात दररोज नियमितपणे साफसफाई करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना उपमहापौर बाबर यांनी आरोग्य विभागाला दिली. तसेच रात्रीच्या वेळी या परिसरात नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश सुरक्षा विभागाला देण्यात आले. परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अशा मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांच्या मदतीने तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी ठणकावले.
पाहणी दौऱ्यादरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्थानिक व्यापारी व नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांनी मांडलेले प्रश्न आणि नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य ओळखून उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यावर तातडीने तोडगा काढावा, असे निर्देश त्यांनी दिले.
भुयारी मार्ग परिसराला पडलेला अतिक्रमणाचा वेढा उठवण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी. हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून काम करावे, असे उपमहापौर बाबर यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यास सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, सुरक्षा निरीक्षक गौरव मोरे, निगडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, राजू चौधरी, शरद रणपिसे, रफीक गोलंदाज, सागर सावंत, बाबुराव इंगळे, बाबुराव चौधरी यांच्यासह इतर अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

