18
आदिवासी विद्यार्थ्यांना अॅनिमियापासून मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम; ‘सीएसीआर’सोबत करार करून ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी!
मुंबई / पिंपरी, प्रतिनिधी दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
आदिवासी विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) समस्येचे प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘अॅनिमिया निवारण कार्यक्रम’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत अवघ्या दीड महिन्यात राज्यातील २०३ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील तब्बल ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (CACR) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून आश्रमशाळांमधील ३७ हजार ९१९ विद्यार्थी आणि ४१ हजार ७०५ विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन पातळी तपासण्यात आली आहे.
तपासणीचे शाळांनिहाय वर्गीकरण:
शासकीय आश्रमशाळा: १४९ शाळांमधील ५५,८६८ विद्यार्थी , अनुदानित आश्रमशाळा: ४८ शाळांमधील २२,४२० विद्यार्थी , एकलव्य मॉडेल निवासी शाळा: ६ शाळांमधील १,३३६ विद्यार्थी

विभागनिहाय तपासणी झालेली विद्यार्थी संख्या-
नाशिक विभाग: ४१,४६९ विद्यार्थी (१०४ शाळा) , ठाणे विभाग: ३३,४२६ विद्यार्थी (८१ शाळा) , अमरावती विभाग: २,८९८ विद्यार्थी (११ शाळा) , नागपूर विभाग: १,८३१ विद्यार्थी (७ शाळा) तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचारांसोबतच पूरक पोषक आहार उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.
“आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अॅनिमिया निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाची समस्या लक्षात घेऊन व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचार व पोषणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.”— लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
