58
वडार समाजाच्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा! पिंपरी-चिंचवडमध्ये ३० ऑगस्ट रोजी ‘वडार समाज संकल्प मेळावा’; जानेवारीत कोल्हापुरात रंगणार भव्य महामेळावा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटितपणे निर्णायक लढा उभारण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कोल्हापूर महामेळाव्याची पूर्वतयारी म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी ‘वडार समाज संकल्प मेळाव्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा संकल्प मेळावा भोसरी येथील टेल्को रोडवर असलेल्या क्वालिटी सर्कल फोरम येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या मेळाव्यास ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी स्वीकारली असून त्यांच्याच नेतृत्वाखाली या मेळाव्याची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे.
या संकल्प मेळाव्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक राहुल भोसले, अवर सचिव (मंत्रालय, मुंबई) राजेश अलकुटे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे स्वीय सहाय्यक यल्लाप्पा गाडीवडर, ‘मी वडार’ संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष मोहिते, संपर्कप्रमुख सुधीर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, सहाय्यक संचालक (मंत्रालय) सजू धोत्रे, वडार एकता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत विटकर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे, साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीता जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय धोत्रे, वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे श्यामराव विटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक (पुणे ग्रामीण) प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज कलगुटकी, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, उद्योजक वसंत विटकर, वडार समाज सेवा संघ अध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष सागर ओरसे आणि लखण पाटकर आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात समाजासाठी उल्लेखनीय आणि बहुमूल्य कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यंदाचा हा मानाचा पुरस्कार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर हनुमंतराव भोसले , अवर सचिव (मंत्रालय, मुंबई) मनोहर बंदपट्टे , सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
वडार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी असलेली १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करण्यात यावी. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून पक्की घरे मिळावीत, तसेच बार्टी व आर्टीच्या धर्तीवर ‘शूरवीर हरबा वडार रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ स्थापन करावे. बेरोजगारांना वसंतराव नाईक महामंडळाकडून विनाअट कर्जपुरवठा करावा आणि भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेसाठी जमीन द्यावी. महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकाने द्यावीत, रॉयल्टी मर्यादा वाढवावी आणि PWD मार्फत शासकीय कामांमध्ये दगडखाण व बांधकाम क्षेत्रातील घटकांना आरक्षण मिळावे.
वडार समाज हा आपल्या कष्ट, श्रम आणि शिल्पकलेच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणारा समाज आहे. मात्र, आजही अनेक कुटुंबे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे ‘हक्कासाठी एकजूट आणि भविष्यासाठी संघर्ष’ या भावनेतून ३० ऑगस्टच्या संकल्प मेळाव्यास आणि जानेवारीतील कोल्हापूर महामेळाव्यास महाराष्ट्रभरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजय चौगुले आणि सुरेश धोत्रे यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
