39
अंमली पदार्थमुक्त समाजासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आवाहन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / आकुर्डी: “तरुणाईला अंमली पदार्थांच्या घातक विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि अंमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करत सक्रिय पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “श्री मोरया पुरस्कार – २०२५” पारितोषिक वितरण सोहळा आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्या प्रसंगी उपस्थित हजारो गणेश भक्तांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त बोलत होते. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याला पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्रीमती श्वेता खेडकर (परिमंडळ-४), संदीप आटोळे (परिमंडळ-१), रोहिदास पवार (गुन्हे), धीरज पाटील (विशेष शाखा), मारुती जगताप (परिमंडळ-३), डॉ. क्रांत देशमुख (वाहतूक) व गणेश इंगळे (मुख्यालय) यांच्यासह सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. शहराभरातील विविध गणेश मंडळांचे सुमारे १,००० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी केले, तर उपक्रमाची पार्श्वभूमी व महत्त्व विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त धीरज पाटील यांनी विशद केले.

‘श्री मोरया पुरस्कार २०२५’ चे प्रमुख विजेते -गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत उत्कृष्ट देखावे व शिस्तबद्ध मिरवणुका काढणाऱ्या १४ प्रमुख सार्वजनिक मंडळांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
१. पोलीस आयुक्तालय स्तर (मुख्य पुरस्कार)- प्रथम क्रमांक (श्री मोरया फिरता करंडक): मयूर मित्र मंडळ, मार्केटयार्ड, चाकण, पुणे. द्वितीय क्रमांक: सुवर्ण मित्र मंडळ, क्रीडा व कला मंच, पिंपरीगाव. तृतीय क्रमांक: सिद्धीचा गणपती महिला मंडळ, बावधन.
२. परिमंडळनिहाय विजेते- परिमंडळ-१: प्रथम – एस.के.एफ. गणेश उत्सव मंडळ (चिंचवड), द्वितीय – भैरवनाथ मित्र मंडळ (पिंपळे गुरव), तृतीय – स्वराज्य मित्र मंडळ (संत तुकाराम नगर, पिंपरी). परिमंडळ-२: प्रथम – सम्राट मित्र मंडळ (थेरगाव), द्वितीय – शिवतेज मित्र मंडळ (उसे शिरगाव), तृतीय – गणेश तरुण मित्र मंडळ (तळेगाव दाभाडे). परिमंडळ-३: प्रथम – नवयुग मित्र मंडळ (चाकण), द्वितीय – जय गणेश प्रतिष्ठान (आळंदी), तृतीय – जय बजरंग मित्र मंडळ (जाधवरवाडी, चिखली).
३. विशेष पुरस्कार- आदर्श देखावा पुरस्कार: विशाल मित्र मंडळ (थेरगाव-वाकड). आदर्श मिरवणूक पुरस्कार: श्री शिवछत्रपती मित्र मंडळ (सद्गुरू चौक, रावेत).
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आगामी गणेशोत्सवात अंमली पदार्थविरोधी संदेशांसोबतच सायबर सुरक्षा, वाहतूक नियम आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंडळांनी प्लास्टीकचा वापर टाळून, शाडूच्या मूर्ती व पर्यावरणपूरक सजावटीचा वापर करावा आणि निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे सांगितले.
आगामी २०२६ च्या गणेशोत्सवासाठी ऑनलाईन परवानग्यांबाबत सॉफ्टवेअर डेव्हलपर सुधीर बोराडे, पोलीस परवानग्यांबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि विद्युत परवानग्यांबाबत ज्ञानदेव तरंगे यांनी मार्गदर्शन केले. शेवटी पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
