news
शिक्षण, कला अन् समाजकारणातील योगदानाबद्दल कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड मनपालिकेत भव्य सत्कार!‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!पिंपरी महापालिकेकडून ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत विशेष मोहीम; कचरा वर्गीकरणासाठी पथनाट्यांद्वारे प्रभावी प्रबोधन!‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!

‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!

डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील हिंद कामगार संघटनेचा उपक्रम; कामगार बंधू-भगिनींच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

श्रमिकांच्या कष्टाने कामगार नगरीचा विकास — महापौर रवी लांडगे; परिचारिका मीरा शिंदे यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार’ प्रदान!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले आहे की, ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.’ या उक्तीप्रमाणे श्रमिकांच्या आणि कामगारांच्या अपार कष्टानेच पिंपरी-चिंचवड या औद्योगिक व कामगार नगरीचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम आणि त्यांची ‘हिंद कामगार संघटना’ संपूर्ण देशभरात कार्य करत आहे. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचा ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार’ प्रथमच एका परिचारिका महिलेला दिला जात असून, हा सन्मान सर्व परिचारिकांचा गौरव आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी केले.
हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात नूतन भोसरी रुग्णालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या परिचारिका मीरा शिंदे यांना महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या सोहळ्यास इंटकचे प्रदेशाध्यक्ष व हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, भारती घाग, निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ मोरे, हाफिज पठाण, आनंदराव फडतरे, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, उत्तम गायकवाड, सारिका भिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार बंधू व भगिनी उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक करताना डॉ. कैलास कदम म्हणाले, “राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली आणि महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलझारीलाल नंदा, मौलाना आझाद यांसारख्या महान नेत्यांचे नेतृत्व लाभलेली ऐतिहासिक संघटना आहे. आज डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हिंद कामगार संघटना इंटकशी संलग्न आहे. स्वतः कामगार चळवळीचे नेते असणारे पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते हा पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटतो.”
मीरा शिंदे यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. कदम पुढे म्हणाले की, “मीरा शिंदे यांनी कुटुंब आणि नोकरीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत एकूण ३१ वर्षे, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत २७ वर्षे अविरत रुग्णसेवा केली आहे. विशेषतः स्वाईन फ्लू आणि कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी बजावलेली सेवा अत्यंत उल्लेखनीय आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गोरिले यांनी केले तर उपस्थितांचे आभार यशवंत सुपेकर यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!