13
पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर; घरातूनच चार प्रकारे कचरा विलगीकरण करण्याचे महापालिकेचे आवाहन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ या अभियानांअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा अशा चार प्रकारे वर्गीकरण करण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. पथनाट्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली.
महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने कचरा विलगीकरणाबाबत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.

या मोहिमेबाबत बोलताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेसोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचरा निर्माण होण्याच्या मूळ ठिकाणीच (स्रोतापाशी) त्याचे योग्य विलगीकरण झाल्यास कचरा प्रक्रिया व व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने घरातूनच चार प्रकारे कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारावी.”
तसेच, “कचरा विलगीकरण हा प्रभावी कचरा व्यवस्थापनाचा पाया आहे. नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे संकलकांकडे द्यावा,” असे आवाहन उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले.

आयोजित करण्यात आलेल्या पथनाट्यांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण न केल्यास उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक व पर्यावरणीय समस्या, तसेच कचरा व्यवस्थापनात सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी यांवर अत्यंत प्रभावी प्रकाश टाकण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेत आणि कचरा विलगीकरणाच्या उपक्रमात शहरातील सर्व नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
