26
बहुआयामी कर्तृत्वाचा गौरव; कल्पना क्षीरसागर यांचा महापालिकेत विशेष सन्मान!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “महिलांनी आपल्या ज्ञानाच्या, कलेच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांत पुढे येणे ही प्रगत समाजाची खरी ओळख आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कल्पना क्षीरसागर यांनी शिक्षणापासून संगीतापर्यंत आणि कलेपासून सामाजिक कार्यापर्यंत विविध क्षेत्रांत केलेली वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून समाजातील प्रत्येक महिलेच्या प्रतिभेचा, आत्मविश्वासाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा सन्मान आहे,” असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.
ज्ञान, कला, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कल्पना प्रकाश क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांतील त्यांचे उल्लेखनीय योगदान, महिला सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आणि सातत्यपूर्ण सामाजिक वाटचालीबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपाई नेते कुणाल वाव्हळकर, प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे, मधुरा शिंदे, सविता आसवानी यांच्यासह विविध नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिकेचे विभागप्रमुख उपस्थित होते.
लेखन, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलाक्षेत्रांतही कल्पना क्षीरसागर यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आपल्या कलागुणांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक जाणिवा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे व मुंबई आकाशवाणीवरही त्यांच्या कार्यक्रमांचे प्रसारण झाले आहे. मातृशक्तीच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा “वुमन ऑफ द वर्ल्ड” हा सन्मान प्राप्त झाला आहे. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कारांनी गौरविले आहे.
“पिंपरी-चिंचवड हे कष्टकरी, उद्यमशील आणि गुणवंत नागरिकांचे शहर आहे. शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी महानगरपालिका नेहमीच सकारात्मकतेने उभी राहील. त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असेही महापौर लांडगे या वेळी म्हणाले. सत्काराच्या मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
