news
‘शहराचा खरा विकास कला अन् संस्कृतीतूनच’; भव्य पिंपरी-चिंचवड महोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्यास प्राधान्य’; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे प्रतिपादन!‘सरकारी रुग्णालयांतील निष्काळजीपणा खपवून घेणार नाही’; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यस्तरीय रुग्णालय सुरक्षा अभियानाची मागणी!‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’चा पिंपरी महापालिकेत फज्जा; सांगवी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई!पिंपरी-चिंचवडला आदर्श ‘शैक्षणिक हब’ बनवण्यासाठी ठोस पाऊल; ‘नो बॅग डे’सह कौशल्याधारित शिक्षणावर रिटा सानप यांचा भर!
Home पिंपरी चिंचवड ‘स्टार बाजार’ लक्ष्य करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; ४ महिलांसह ७ जणांना वाकड पोलिसांकडून अटक!

‘स्टार बाजार’ लक्ष्य करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; ४ महिलांसह ७ जणांना वाकड पोलिसांकडून अटक!

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या बळावर आरोपींना बेड्या; मुंबईसह पुणे अन् पिंपरी-चिंचवडमधील अनेक गुन्हे उघडकीस | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्टार बाजारमध्ये महागड्या वस्तूंची चोरी करणारी सराईत टोळी वाकड पोलिसांकडून गजाआड; इनोव्हा कारसह ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

वाकड / पिंपरी: सुप्रसिद्ध ‘स्टार बाजार’ या सुपरमार्केटमधून काजू, बदाम आणि तुपाच्या पाऊचसारख्या महागड्या खाद्यवस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार महिला आणि तीन पुरुषांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार आणि ऑटो रिक्षासह एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वाकड येथील दत्त मंदिर रोडवर असलेल्या ‘यशवंत बिल्डिंग’मधील स्टार बाजार तसेच कलाटे वस्ती येथील स्टार बाजार येथे आरोपींनी रिक्षाने येऊन गोवर्धन तूप, काजू व बदामाची पाकिटे असा एकूण ४२ हजार १०० रुपयांचा माल चोरी केला होता. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार चोरीच्या घटनेनंतर मुंबईच्या दिशेने गेली असून ती पुन्हा ताथवडे-वाकड परिसरात आल्याची खबर मिळताच, पोलिसांनी सापळा रचून इनोव्हा कार व ऑटो रिक्षासह सातही आरोपींना ताब्यात घेतले.

रविकांत देवानंद जाकरे (वय ३२, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई / मूळ रा. देगलूर, नांदेड),  ब्रिजेश सिताराम मदेशिया (वय २७, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई),  बिजेश बाजू यादव (वय ३७, रा. जोगेश्वरी वेस्ट, मुंबई),  सोबन बालु शेख (वय ३७, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई / मूळ रा. देगलूर, नांदेड),  सलमा शकिल शेख (वय ४१, रा. बालाजी नगर, भोसरी, पुणे),  सानिया बालुमिया शेख (वय २०, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई),  रुमा ब्रिजेश मदेशिया (वय २७, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई) या सर्व आरोपींना ३१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

पोलीस कस्टडीदरम्यान सखोल चौकशी केली असता, आरोपींनी वाकड व्यतिरिक्त पिंपरी पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे, पिंपळे सौदागर (काटे पिंपळे) आणि वाघोली (केसनंद फाटा) येथील स्टार बाजारमध्येही काजू, बदाम आणि तुपाच्या पाऊचची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांनी मुंबई, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित महाराष्ट्रात अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही धडक कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शंतनू महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, तसेच पोलीस अंमलदार दळे, चंद गिरे, विजय घाडगे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन गायकवाड, विजय मोरे, कौंतेय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, विक्रम भगत, समाधान कांबळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडेमंगेश लोखंडे यांनी ही मोहीम फत्ते केली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!