27
‘आर्टी’कडून अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (पीएच.डी. फेलोशीप) वयोमर्यादेत शिथिलता; कमाल वय ४५ वर्षे!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई / पिंपरी: अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम (मातंग, मांग, मिनीमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग गारुडी, मादगी, मादिगा) समाजातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) ने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशीप) कमाल वयोमर्यादा ३५ वरून थेट ४५ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही वयोमर्यादेची शिथिलता विशेषतः शैक्षणिक वर्ष २०२३ च्या अधिछात्रवृत्तीसाठी लागू राहणार आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पीएच.डी.साठी कायमस्वरूपी नोंदणी केलेल्या पात्र संशोधक विद्यार्थ्यांना या ४५ वर्षांपर्यंतच्या वयोमर्यादेचा थेट लाभ घेता येणार आहे.
‘आर्टी’च्या वतीने अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम समाजातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी ‘अण्णा भाऊ साठे संशोधन अधिछात्रवृत्ती योजना’ २०२६ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत २०२३, २०२४ आणि २०२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकडून अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
यापूर्वी या फेलोशीपसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता २०२३ च्या अधिछात्रवृत्तीसाठी ही मर्यादा ४५ वर्षांपर्यंत वाढविल्यामुळे उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रौढ व अनुभवी संशोधकांनाही संशोधनासाठी भरीव आर्थिक पाठबळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’साठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदतही वाढविण्यात आली असून पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील वारे यांनी केले आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी ‘आर्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अटी तपासून मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादेत केलेली ही शिथिलता आणि अर्जाची वाढविलेली मुदत यामुळे मातंग व तत्सम समाजातील पीएच.डी. संशोधकांना आपले संशोधन पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या निर्णयामुळे ज्ञाननिर्मितीच्या प्रवाहात वंचित समाजातील संशोधकांचा सहभाग अधिक व्यापक आणि बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
