20
जिल्हा स्त्री रुग्णालयातील मृत नवजात शिशुंना श्रद्धांजली; युवा स्वाभिमान पार्टीची दहिहांडी रद्द करण्याबाबत शंकर नगर येथे महत्त्वाची बैठक संपन्न!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या नवजात शिशुंना श्रद्धांजली अर्पण करून, युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने यावर्षी आयोजित करण्यात येणारा दहिहांडी उत्सव रद्द करावा किंवा नाही, याबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक शंकर नगर येथील कार्यालयात पार पडली. ही बैठक युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी मृत नवजात शिशुंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून मृत शिशुंच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या.
या बैठकीदरम्यान दहिहांडी रद्द करण्याबाबत कोअर कमिटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनीदेखील या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर दहिहांडी रद्द करण्यासंदर्भात पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याबाबत बोलताना आ. रवी राणा म्हणाले, “माजी खासदार नवनीत राणा यांच्या भावनांचा आणि जनभावनेचा पूर्ण मान राखून युवा स्वाभिमान पार्टीच्या दहिहांडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. येत्या दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन कोअर कमिटीच्या माध्यमातून दहिहांडी रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल.”
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर मृत नवजात शिशुंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आ. रवी राणा यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या अथक पाठपुराव्याला यश आले असून, शासनाच्या वतीने मृत नवजात शिशुंच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या शासकीय मदतीसोबतच युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनेदेखील मृत शिशुंच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचे आ. राणा यांनी स्पष्ट केले.
युवा स्वाभिमान पार्टीची दहिहांडी ही नेहमीच सामाजिक संदेश देणारी राहिली आहे. दहिहांडी साजरी करण्याचा निर्णय झाल्यास ती कोणत्याही मोठ्या जल्लोषाशिवाय, अत्यंत साध्या पद्धतीने, लहान मुलाच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाचे पूजन करून आणि हंडी फोडून साजरी केली जाईल, असेही आ. रवी राणा यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, मार्गदर्शक सुनील राणा, शैलेंद्र कस्तुरे, शिवदास घुले, प्रा. अजय गाडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, विनोद जायलवाल, जयंतराव वानखडे, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती प्रीती रेवणे, नगरसेवक किशोर जाधव, गंगाधर आवारे, नितीन बोरेकर, जिल्हा महिला अध्यक्षा सोनाली नवले, नगरसेविका सुमती ढोके, नगरसेवक प्रशांत वानखडे, अजय जयस्वाल, दीपक सम्राट, महेश मुलचंदानी, ज्योती सैरीसे, मंगेश इंगोले, किशोर पिवाल, योगेश विजयकर, प्रा. सतीश खोडे, गणेश गायकवाड, विनोद गुहे, अविनाश काळे, विलास वाडेकर, नगरसेविका अर्चना पांडे, प्रियंका पाटणे, चंदा लांडे, सारिका अवघड, पराग चिमोटे, बाळू इंगोले, प्रमोद येवतीकर, आशिष कावरे, उदय पर्वतकर, राजा बांगडे, सविता नेवारे, सुनीता राऊत, नीता खडसे, मुकेश उसरे, किरण अंबाडकर, प्रवीण धुराटकर, वंदना जामनेकर, प्रेमा लव्हाळे, डॉ. बाळापुरे, राजू हरणे, जगदीश गुल्हाने, संदीप कांबळे, भूषण पाटणे, कीर्ती लोरे, वर्षा पाटणे, महेश किल्लेकर, मधुकर देऊळकर, अब्दुल कय्युम, शंकर खंडारे, सूरज मिश्रा, भारती गुडधे, खुशाल गोंडाणे, डॉ. बनसोड, आशिष गावंडे, डॉ. मनिष कोल्हे, निखिल आकोटकर, कुणाल गुप्ता, ॲड. रोहन शर्मा यांच्यासह पक्षाचे सर्व कोअर कमिटी सदस्य, उपमहापौर, नगरसेवक, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
