39
चोविसावाडीत पिंपरी-चिंचवड पालिकेची मोठी कारवाई; अनधिकृत जाहिरात फलक लोखंडी स्ट्रक्चरसह केला निष्कासित!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / चोविसावाडी: स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आणि पालिकेचा महसूल बुडवणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात (Hoarding) धडक मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत चोविसावाडी (काळीभित रोड) येथील सर्व्हे नं. १७५/९ मधील ३० बाय ३० आकाराचा भलामोठा अनधिकृत जाहिरात फलक लोखंडी स्ट्रक्चरसह पूर्णपणे निष्कासित करण्यात आला आहे. ही विशेष कारवाई आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उप-आयुक्त राजेश आगळे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नियम २४४, २४५ तसेच ‘महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम २०२२’ नुसार खाजगी जागेतही जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काही घटकांकडून पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जाहिरात फलक उभे केले जातात. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात मोठा फटका बसत आहे.
या पार्श्वभूमीवर, शहराचे सौंदर्य जपणे आणि पालिकेच्या महसुलात वाढ करणे या दुहेरी उद्देशाने अनधिकृत जाहिरात फलकांची स्थळ पाहणी करून ते तातडीने हटवण्याची विशेष मोहीम शहरात सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या मोहिमेत ताथवडे येथील अनधिकृत जाहिरात फलकांवर, तसेच थरमॅक्स चौकातील समर्थ सहकारी बँकेच्या इमारतीवरील बेकायदेशीर फलकांवर कारवाई करून ते निष्कासित करण्यात आले होते. त्याच साखळीत आता चोविसावाडी येथील ३०×३० आकाराचा अनधिकृत फलक लोखंडी सांगाड्या फेकत संपूर्णपणे हटवण्यात आला आहे.
उप-आयुक्त राजेश आगळे यांनी या प्रेस नोटद्वारे शहरातील सर्व जाहिरात एजन्सी आणि व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे:
“यापुढे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये पूर्वपरवानगीशिवाय एकही अनधिकृत जाहिरात फलक उभारू नये. असे अनधिकृत फलक उभे केल्याचे निदर्शनास आल्यास ते महापालिकेच्या वतीने तात्काळ निष्कासित केले जातील आणि संबंधित घटकांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. याची सर्व जाहिरात एजन्सींनी गंभीरपणे नोंद घ्यावी.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
