45
पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा काढावा: महापौर रवि लांडगे!
पिंपरी / पुणे प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / पुणे: पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘पवना जलवाहिनी प्रकल्पा’बाबत (Pavana Pipeline Project) मावळ क्षेत्रातील शेतकरी बांधव आणि सर्व संबंधित घटकांच्या अडचणी संवेदनशीलतेने विचारात घेऊन समन्वयाने सर्वमान्य तोडगा काढावा, अशी आग्रही भूमिका पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी मांडली आहे. या प्रलंबित विषयाला गती देण्यासाठी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना केली.
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘दिशा समिती’च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले असताना महापौर रवि लांडगे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.
भेटीदरम्यान महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले की, पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला मुबलक पाणी मिळणे जितके गरजेचे आहे, तितकेच मावळ भागातील शेतकऱ्यांचे हित जपले जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यापूर्वी शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये त्यांच्या विविध अडचणी आणि अपेक्षा समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने मावळमधील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद साधून, त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या प्रकल्पातील प्रलंबित मुद्द्यांवर अंतिम आणि सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन या बैठकीचे नियोजन करावे, अशी विनंती महापौरांनी केली.
“पवना जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच वेळी मावळमधील बळीराजाच्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षांचाही संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे. कोणावरही अन्याय न होता सर्व घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा निघाला पाहिजे. यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर पुढील बैठक आयोजित करून विषयाला गती देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शहराची पाण्याची गरज भागवण्यासोबतच शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.”— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महापौर रवि लांडगे यांच्या या मध्यस्थी आणि समन्वयाच्या भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
