104
शिक्षिका पूनम कोलते यांच्या पुढाकारातून ‘गोपाळकाला’ प्रसादाचा अभिनव उपक्रम; पिंपळे सौदागरच्या प्राथमिक शाळेत सामाजिक समभावाचा संदेश!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपळे सौदागर: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्रमांक ५१ मध्ये बालवाडी शिक्षिका पूनम कोलते यांच्या कल्पकतेतून आणि पुढाकारातून सलग चौथ्या वर्षी ‘गोपाळकाला’ प्रसादाचा एक अत्यंत वेगळा, संस्कारक्षम आणि स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला. स्नेहाताई चिंचवडकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा गेंगजे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
सामान्यतः प्रत्येक शाळेमध्ये गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीची फोडाफोडी आणि जल्लोष साजरा केला जातो. मात्र, दहीहंडीनंतर प्रसाद म्हणून दिला जाणारा ‘गोपाळकाला’ कसा बनवला जातो, त्यामध्ये कोणकोणते घटक व पदार्थ असतात, याचे कोणतेही ज्ञान बालवयातील लहान मुलांना नसते. हीच गोष्ट लक्षात घेऊन शिक्षिका पूनम कोलते यांनी चार वर्षांपूर्वी या वेगळ्या उपक्रमाची आखणी केली.
या उपक्रमांतर्गत बालवाडीतील सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना घरातून काल्यासाठी लागणारे विविध पदार्थ थोडे-थोडे आणण्यास सांगितले जाते. त्यानंतर वर्गातच सर्व मुलांच्या समक्ष एकत्र येऊन त्या साहित्याचा महाप्रसाद (काला) तयार केला जातो. सर्व पदार्थांचे मिश्रण करून बनवलेला हा काला एकत्र बसून खाताना लहान वयातच विद्यार्थ्यांवर ‘सामाजिक समभाव’, ‘एकता’ आणि ‘बंधुभाव’ या मूल्यांचे नकळत संस्कार रुजतात.

या आदर्श सोहळ्यासाठी मुख्य बालवाडी समन्वयक यमुना खंडागळे, निवृत्त बालवाडी शिक्षिका अरुणा शिंदे, लखनऊ येथील निवृत्त शिक्षिका रेखा बाजपेयी यांची विशेष उपस्थिती लाभली.
त्याचप्रमाणे गोसेविका अलकाताई मुळे, शंखवादक प्रणिताताई अवधूत, ‘T4N’ अभ्यासिकेच्या माध्यमातून गरजूंना निस्वार्थीपणे मोफत शिक्षण देणाऱ्या श्रद्धा देशमुख, बाल नाट्यकलाकार दुर्वेश चिंचवडकर आणि सर्व उत्सुक पालक वर्ग या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पिंपळे सौदागरच्या प्राथमिक शाळा क्र. ५१ मध्ये दरवर्षी सातत्याने राबवला जाणारा हा गोपाळकाल्याचा उपक्रम संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी आणि समाजापुढे एक उत्तम आदर्श वस्तुपाठ ठरत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
