37
मकोका गुन्ह्यातील सराईत इराणी चैन चोरट्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ठोकल्या बेड्या; ३५ लाखांचे २७ तोळे सोने जप्त, १५ गुन्हे उघड!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / निगडी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत इराणी चैन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला अभूतपूर्व यश आले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA) दाखल गुन्ह्यासह इतर ०५ गंभीर गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात इराणी चैन चोरटा आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी ३५ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे १०० टक्के चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले असून, तब्बल १५ चैन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चैन चोरीच्या गुन्ह्याचा (गु.र.नं. २८५/२०२६) तपास करताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने परिसरातील सुमारे ४०० ते ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज कसून तपासले. या फुटेजचा माग काढत पोलीस पथक थेट मुंबईपर्यंत पोहोचले आणि आरोपी फिदा इराणी व आदित्य मनलोर यांची ओळख पटवली.
त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी देहूरोड परिसरातून मुख्य आरोपी फिदा इराणी याला साथीदारासह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) फिदा हुसैन मानुआली इराणी (वय ३३ वर्षे, रा. महात्मा गांधी वसाहत, इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे), २) मुकेश अरुण नेटके (वय ३८ वर्षे, रा. गल्ली नं. २, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे)

अटक करण्यात आलेल्या फिदा इराणी याने साथीदार आदित्य मनलोर आणि कासीम जाफर हुसेन यांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत १३ ठिकाणी आणि पुणे शहर हद्दीत ०२ ठिकाणी अशा एकूण १५ ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या ओरबाडल्याचे निष्पन्न झाले आहे.
या १५ गुन्ह्यांमधील १०० टक्के चोरीचा मुद्देमाल म्हणजेच ३५,३३,००० रुपये किमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपी फिदा इराणी याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि चैन चोरीसारखे गंभीर १० गुन्हे दाखल आहेत.

एमआयडीसी भोसरी (१), तळेगाव दाभाडे (२), देहूरोड (२), निगडी (२), रावेत (२), हिंजवडी (३), वाकड (१) आणि पुणे शहरातील खराडी (१) व विश्रामबाग (१) पोलीस ठाण्यांतील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
याशिवाय, चैन चोरी व बतावणी करणाऱ्या तालीम बाबा इराणी (वय २१) आणि अली अब्बास शौकत इराणी (वय २८, दोघे रा. पाटील इस्टेट, पुणे) या आणखी दोन सराईत आरोपींना ०८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी यवत पोलीस ठाण्याच्या (पुणे ग्रामीण) सुपूर्द करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सन २०२६ या एकाच वर्षात आतापर्यंत एकूण ३२ चैन चोरीचे गुन्हे उघड करून ५० लाख ६३ हजार रुपये किमतीचे ४१ तोळे सोने जप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पो.उ.नि. शिवानंद स्वामी, महेश खाडे आणि त्यांच्या सर्व अंमलदारांनी फत्ते केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
