news
Home पिंपरी चिंचवड ‘कौसल्येचा राम बाई’ ते ‘जयोस्तुते’; मराठी गीतविश्वातील स्त्रीच्या विविध भावछटांचा अप्रतिम आविष्कार!

‘कौसल्येचा राम बाई’ ते ‘जयोस्तुते’; मराठी गीतविश्वातील स्त्रीच्या विविध भावछटांचा अप्रतिम आविष्कार!

'अभिजात मराठी भाषा सप्ताहा'त रसिक भक्तिरसात चिंब; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कार्यक्रमाला प्रेक्षकांची दाद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘धरित्रीच्या लेकी’मधून मराठी गीतांमधील स्त्रीभावनेचा सुरेल जागर!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहांतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘धरित्रीच्या लेकी’ हा संगीतमय कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गायक धनंजय म्हसकर, अमोल बावडेकर तसेच गायिका योगिता गोडबोले, प्रिती निमकर आणि अनघा पेंडसे यांच्या सुरेल सहभागातून सादर झालेल्या या कार्यक्रमातून मराठी गीतांमधून व्यक्त झालेल्या स्त्रीच्या विविध भावविश्वाचा अविष्कार रसिकांसमोर उलगडला. स्त्रीचे मातृत्व, ममत्व, प्रेम, भक्ती, कर्तृत्व आणि स्वाभिमान अशा विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या गीतांनी प्रेक्षागृहात विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाची सुरुवात शांता शेळके लिखित ‘जय शारदे वागीश्वरी’ या सरस्वती वंदनाने झाली. त्यानंतर ‘कौसल्येचा राम बाई’ या भक्तिगीताने व ‘गुणी बाळ असा जागसी का रे वाया’ या अंगाईगीताने वात्सल्याचा भाव उभा केला. संतपरंपरेतील ‘माझे माहेर पंढरी’ आणि ‘विठू माऊली तू’ या रचनांनी प्रेक्षकांना भक्तिरसात चिंब भिजवले.
तसेच, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’, ‘लाजून हासणे अन् हासून ते पाहणे’, ‘त्याची धून झंकारली रोमारोमांत’, ‘नाविका रे वारा वाहे रे’ आणि ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ यांसारख्या अजरामर भावगीतांनी रसिकांना मराठी गीतविश्वाची सुरेल सफर घडवली.

ग. दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या गीताने कार्यक्रमात लोकसंगीताचा रंग भरला. ‘आम्ही जिजाऊंच्या मुली’ या गीतातून स्वाभिमान आणि स्त्रीशक्तीचा हुंकार अधोरेखित झाला.
याशिवाय आनंदघन यांचे संगीत असलेले ‘बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला’ तसेच ‘माझे राणी, माझे मोगा’ या कोकणी लहेजातील प्रेमगीताने रसिकांची दाद मिळवली. सहजीवनातील भावबंध जपणारे ‘नसतेस घरी तू जेव्हा’ आणि ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’ या रचनांनी वातावरण अधिक भावस्पर्शी केले. ‘आईचा जोगवा’ या पारंपरिक रचनेने भक्तीचा रंग अधिक गडद केला.

मराठी गीत-संगीत आणि स्त्रीजीवनाच्या विविध भावछटांचा सुरेल पट उलगडत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रचित व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ या स्फूर्तीगीताने झाली.
अभिजात मराठी भाषेच्या वैभवातील साहित्य, संगीत आणि संस्कृतीचा परिचय नागरिकांना करून देत लोकसहभाग वाढवण्याचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरत असल्याचे या सोहळ्यावरून दिसून आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!