20
अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘नियम आणि अटी लागू’ने रंगवला संसारातील नात्यांचा खेळ!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: संसाराच्या गाड्याला दोन चाकं असली, तरी त्याचा प्रवास सुरळीत होण्यासाठी प्रेमाची ऊब, संवादाची सोबत, समजुतीची सावली आणि विनोदाची हलकीशी फुंकर तितकीच गरजेची असते. याच भावविश्वाला मिश्कील विनोदाची झालर आणि नात्यांच्या वास्तवाची हळुवार किनार देत ‘नियम आणि अटी लागू’ या नाटकाने अभिजात मराठी भाषा सप्ताहातील रंगमंच अक्षरशः फुलवून टाकला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सादर झालेल्या या नाट्यप्रयोगाला नाशिक व पिंपरी-चिंचवडच्या रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते नाटकाचे लेखक व प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आपला सन्मान स्वीकारताना संकर्षण कऱ्हाडे म्हणाले की, “अभिजात मराठी भाषा सप्ताह हा अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. मराठी भाषा, साहित्य, रंगभूमी आणि कलाविश्वाचा असा उत्सव थेट नागरिकांपर्यंत पोहोचणे ही आनंदाची बाब आहे. आम्हाला पिंपरी-चिंचवडमध्ये हे नाटक सादर करण्याची संधी मिळाली याचा मनापासून आनंद असून, अशा दर्जेदार उपक्रमांसाठी पुन्हा पुन्हा या रसिकांसमोर येण्याची इच्छा आहे.”
लेखक संकर्षण कऱ्हाडे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते प्रशांत दामले यांच्या या नाटकातून नव्याने संसार थाटलेल्या दोन तरुणांच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या कुरबुरी, अपेक्षा आणि गैरसमज यांचा वेध घेतला जातो. संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून संसारातील विविध छटा रंगमंचावर जिवंत झाल्या.
नाटक कुठेही गंभीर समुपदेशनाचा आव न आणता, मिश्कील विनोदाच्या माध्यमातून ‘नातं जपण्यासाठी आखलेले नियम आणि अटी कधी कधी त्याच नात्याभोवती अदृश्य कुंपण कसे उभे करतात’, याची जाणीव हसतखेळत करून देते. संसाराचा रथ पुढे नेताना तिसऱ्या व्यक्तीपेक्षा दोन माणसांमधील थेट आणि मोकळा संवाद किती महत्त्वाचा आहे, हा संदेश नाटकाने रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवला.
संकर्षण कऱ्हाडे यांच्या सहजसुंदर, तडफदार व समयसूचक अभिनयाने प्रेक्षागृहात हास्याचे कारंजे फुलवले, तर अमृता देशमुख यांच्या भावस्पर्शी देहबोलीने व नेमक्या संवादफेकीने नाटकाला अधिक गहिरेपण दिले. हास्य, भावना आणि नात्यांची ऊब यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासोबतच नात्यांच्या आरशात स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
