news
Home पिंपरी चिंचवड ‘गाण्यामागील भावविश्व अन् संगीतप्रवासाच्या आठवणी’; पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गप्पांनी रसिक मंत्रमुग्ध!

‘गाण्यामागील भावविश्व अन् संगीतप्रवासाच्या आठवणी’; पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गप्पांनी रसिक मंत्रमुग्ध!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम; गायिका विभावरी आपटे-जोशी यांच्या सुरेल गायकीने प्रेक्षागृह भारावले | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: शब्दांमधील भाव जाणून घेत त्यांना स्वरांची साथ देत जन्माला आलेली गाणी आणि त्या गीतांच्या निर्मितीमागच्या असंख्य आठवणी… कधी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या स्वरांची आठवण, तर कधी आशा भोसले यांच्या गायकीचा संदर्भ, कधी शांता शेळके आणि सुरेश भट यांच्या शब्दांमागच्या कथा… अशा शब्द-सूर-आठवणींच्या त्रिवेणी संगमाने पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ ही मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.
अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह तिचे संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे ही सांगीतिक सायंकाळ रंगली.

पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘माझ्या सारंगा’, ‘गोमू माझ्या तू संगतीने’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धरला तू माझा हात’, ‘मी डोलकर डोलकर’, ‘डोलकर दर्याचा राजा’, ‘घर पाण्यावरी’, ‘बंदराला करतो ये-जा’, ‘माझे रानी, माझे मोगा’, ‘तुजे डोळ्यांत शोधता ठाव’ आणि ‘मोगरा फुलला’ अशा एकाहून एक सरस गीतांनी प्रेक्षागृह सुरांनी भारून गेले.
गाण्यांसोबतच एखाद्या गीताची रचना कशी सुचली, चाल कशी लाभली आणि संगीतबद्ध करताना कोणते प्रसंग घडले, या आठवणी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी उलगडल्यामुळे रसिकांना गाण्यामागील भावविश्व जाणून घेण्याची नवी दृष्टी मिळाली.

भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासोबतच्या सांगीतिक प्रवासातील आठवणी सांगताना पंडितजी भावुक झाले. दोन्ही बहिणींच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून ते गाण्याच्या सादरीकरणापर्यंतचे अनेक किस्से त्यांनी रसिकांसमोर मांडले. तसेच कवयित्री शांता शेळके आणि गझलकार सुरेश भट यांच्या काव्यामागील अर्थ व गीतनिर्मितीचा रंजक प्रवास त्यांनी श्रोत्यांसमोर उलगडला. गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी आपल्या भावपूर्ण गायकीने या गीतांना सुरेल साज चढवला.

या मैफलीस तबल्यावर डॉ. राजेंद्र दुरकर आणि विक्रम भट, रिदमवर अजय अत्रे, बासरीवर अमर ओक तर सिंथेसायझरवर दर्शना जोग यांनी अप्रतिम साथसंगत केली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केले. या प्रसंगी भारती मंगेशकर आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांची विशेष उपस्थिती होती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!