33
गिनीज विश्वविक्रमात चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे नाव सुवर्णअक्षरांनी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देत पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एकाच वेळी तब्बल ४,११२ ढोलवादकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वादन करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ (Guinness World Records) मध्ये नवा ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला. या उपक्रमाच्या अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्रावर ‘चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लिमिटेड’चे नाव नोंदविण्यात आल्यामुळे चिखली-मोशी परिसरासह संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी हा भव्य सोहळा पार पडला. मोशी, स्पाईन रोड आणि वाघेश्वर मंदिर (चऱ्होली) या तीन ठिकाणी एकाच वेळी हे भव्य वादन आयोजित करण्यात आले होते.
या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी वादकांना सलग ५ मिनिटे एकाच वेळी व शिस्तबद्ध वादन करण्याच्या तीन संधी देण्यात आल्या होत्या. यापूर्वी २,६५० ढोलवादकांचा विक्रम नोंदवला गेला होता. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४,११२ ढोलवादकांनी एकत्र येत जुना विक्रम मोडीत काढला व नवा इतिहास रचला.
ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादाने, शंखनादाने आणि ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
सोहळ्यात १११ शंखांचा सामूहिक शंखनाद विशेष आकर्षण ठरला. तसेच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’सोबत उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या धर्मध्वजालाही मानवंदना देण्यात आली. ‘शिवशंभो गर्जना’, मर्दानी खेळ, शाहिरी सादरीकरण यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून शिव-शंभूंच्या शौर्याचा जागर करण्यात आला. या प्रसंगी ‘गोमाता सन्मान अभियान’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ राबवत उपस्थितांनी नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. तसेच भारतमातेची आकर्षक रांगोळी व संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले.
चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने या ऐतिहासिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशन शहरातील सोसायटीधारकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहे. आता गिनीज बुकच्या अधिकृत प्रमाणपत्रावर फेडरेशनचे नाव कोरले गेल्याने हा सोसायटीधारकांसाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पिंपरी-चिंचवडचे नाव नोंदविले जाणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यात आमच्या फेडरेशनचे नाव गिनीजच्या अधिकृत प्रमाणपत्रावर येणे हा विशेष आनंदाचा क्षण आहे. हजारो वादकांची शिस्त, स्वयंसेवकांचे नियोजन आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा विक्रम साकार झाला. हा विश्वविक्रम आपल्या सांस्कृतिक एकतेचा आणि सामूहिक सहभागाचा गौरव आहे.” — संजीवन सांगळे (अध्यक्ष, चिखली-मोशी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
