71
‘All is well’ म्हणणाऱ्या लाचखोर महिला पोलीस निरीक्षक सुनीता राणींची सेवेतून हकालपट्टी; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई!
पंजाब प्रतिनिधी, दि. ०५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पंजाब: ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर आणि अटक झाल्यानंतरही माध्यमांसमोर “ऑल इज वेल… (सब कुछ ठीक है)” असे म्हणत पोलिसांच्या प्रतिमेची खिल्ली उडवणाऱ्या महिला पोलीस निरीक्षक (SHO) सुनीता राणी यांच्यावर पंजाब पोलीस दलाने अखेर बडतर्फीची कुऱ्हाड चालवली आहे. फरिदकोट रेंजच्या पोलीस महानिरीक्षक (IGP) निलांबरी जगदाळे यांनी कोणत्याही विभागीय चौकशीशिवाय सुनीता राणी यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत. मोगा जिल्ह्यातील कोट इसे खान पोलीस ठाण्यात त्या प्रभारी (SHO) म्हणून कार्यरत होत्या.
विजिलन्स ब्युरो (फिरोजपूर रेंज) यांनी २६ सप्टेंबर रोजी सुनीता राणी आणि होमगार्ड जवान गुरअवतार सिंग यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी त्यांना मोगा न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टातून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना ५० हजार रुपयांच्या लाचेबाबत विचारले असता, त्यांनी अतिशय निष्काळजीपणे आणि हसत उत्तर दिले— “ऑल इज वेल, ऑल इज वेल… जेलचे नवीन मॉड्यूल सुरू झाले आहे, हा आयुष्याचा एक भाग आहे. माणसाने नेहमी धीट राहिले पाहिजे.”
त्यांच्या या बेजबाबदार आणि उद्धट वर्तनामुळे पोलीस दलाची जनतेतील प्रतिमा प्रचंड मलिन झाली. यामुळे पोलीस शिस्तीला तडा गेल्याचे सांगत आयजींनी ही कठोर कारवाई केली.
मोगाच्या पोलीस अधीक्षकांनी (SSP) दिलेल्या अहवालानुसार, सुनीता राणी यांच्याबाबत नागरिकांकडून लाच मागण्याच्या अनेक तोंडी तक्रारी आल्या होत्या. अंमली पदार्थ (NDPS Act) गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देऊन त्या लोकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले. ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्या देत असत.
पोलीस दलात ‘झिरो टॉलरन्स’ (Zero Tolerance) धोरण राबवताना, सरकारी कर्मचारी आचारसंहिता १९६६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना खात्यातील ‘काळा डाग’ ठरवण्यात आले.
नियमित विभागीय चौकशी केल्यास त्या साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, त्यांना धमकावू शकतात किंवा प्रलोभन दाखवू शकतात, अशी भीती व्यक्त करत आयजी निलांबरी जगदाळे यांनी विशेष अधिकारांचा वापर करून कोणतीही चौकशी न करता त्यांना थेट सेवेतून बडतर्फ (Dismiss) केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
