34
उसतोडीच्या पैशांच्या वादातून अपहरण; महाळुंगे पोलिसांची धडक कारवाई, २४ तासांत यवतमाळमधून अपहृताची सुखरूप सुटका!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: उसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून घाटेवस्ती आंबेठाण येथून एका इसमाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने २४ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यवतमाळ येथून अपहृत इसमाची सुखरूप सुटका करत या प्रकरणी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घाटेवस्ती आंबेठाण येथून तीन रिक्षांमधून आलेल्या इसमांनी राजेश बाळू चव्हाण यांचे त्यांच्या मोटारसायकलसह जबरदस्तीने अपहरण केले होते. याप्रकरणी फिर्यादी सुषमा राजेश चव्हाण (वय ३० वर्षे) यांच्या तक्रारीवरून उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १४० (१), १४० (२), १२६ (२), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकाने १) अमोल रामराव राठोड (वय २९), २) सचिन रामराव राठोड (वय २५) आणि ३) निलेश संतोष राठोड (वय २७) या तिघांना शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, संदीप गुलाब राठोड (रा. यवतमाळ) याच्या उस टोळीच्या उचलीचे पैसे राजेश चव्हाण घेऊन आल्याने, एकूण आठ जणांनी मिळून हे अपहरण केल्याची कबुली त्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने तात्काळ हालचाली करत दिंडाळा (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथे धाड टाकली आणि उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन अपहृत राजेश चव्हाण यांची २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली.
अटक आरोपींची नावे १) अमोल रामराव राठोड (वय २९ वर्षे, रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), २) सचिन रामराव राठोड (वय २५ वर्षे, रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), ३) निलेश संतोष राठोड (वय २७ वर्ष, रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), ४) शुभम प्रल्हाद जाधव (वय २५ वर्षे, रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), ५) संदीप गुलाब राठोड (वय ४२ वर्षे, रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), ६) इंदल थावरा जाधव (वय ४० वर्षे, रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), ७) राजू बापूराव चव्हाण (वय ४४ वर्षे, रा. वरुड वेबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), ८) संदीप उदयभान जाधव (वय ३२ वर्षे, रा. नाईकनगर तांडा, ता. हदगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडाई वेन्यू कार, तीन ऑटो रिक्षा आणि अपहृत इसमाची शाईन मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (महाळुंगे विभाग) प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सपोफौ यदू आढारी, पोलीस अंमलदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, बापूराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभारे व समीर महात यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
