34
‘बार्टी’च्या कौशल्य विकास विभागाला २०२६-२७ मध्ये ‘शून्य’ निधी; रोजगाराभिमुख प्रशिक्षणाबाबत तरुणांमध्ये संभ्रम!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: वंचित व मागासवर्गीय घटकातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या’ (बार्टी – BARTI) कौशल्य विकास विभागाला आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य शासनाकडून कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झालेला असताना यंदा अचानक निधी शून्य का करण्यात आला, असा संतप्त प्रश्न विद्यार्थी आणि सामाजिक वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
गेल्या चार वर्षांतील निधी आणि खर्चाचा ताळेबंद
| आर्थिक वर्ष | प्राप्त निधी | झालेला खर्च | शिल्लक निधी |
| २०२३-२४ | ₹ ७ कोटी | ₹ ७ कोटी | शून्य |
| २०२४-२५ | ₹ २१ कोटी | ₹ २१ कोटी | शून्य |
| २०२५-२६ | ₹ १५ कोटी | ₹ १३.८५ कोटी | ₹ १.१५ कोटी |
| २०२६-२७ | निरंक (शून्य) | निरंक | निरंक |
गेल्या तीन वर्षांत उपलब्ध झालेल्या एकूण ४३ कोटी रुपयांपैकी तब्बल ४१.८५ कोटी रुपयांचा यशस्वी विनियोग झाला आहे. तरीदेखील यंदा तरतूद न केल्यामुळे सध्या सुरू असलेले प्रकल्प, प्रस्तावित प्रशिक्षणे आणि नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘बार्टी’च्या कौशल्य विकास विभागाचे काम आता ‘महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे’ वळविण्यात आल्याची चर्चा असून महामंडळाने या संदर्भात जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
“‘बार्टी’च्या विभागाची जबाबदारी बदलण्यामागील प्रशासकीय कारणे काय आहेत? दोन्ही संस्थांमधील कामाचे विभाजन कसे करण्यात आले आहे आणि यापुढे कौशल्य प्रशिक्षणाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, हे शासनाने तातडीने स्पष्ट केले पाहिजे. तसेच यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ५ हजार तरुणांच्या रोजगारस्थितीचा अधिकृत डेटा जाहीर करावा.”— ॲड. कुलदीप आंबेकर, संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हँड्स
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
