news
Home पिंपरी चिंचवड ‘पर्यावरण संवर्धनापासून कचरा व्यवस्थापनापर्यंत; पिंपरीच्या महिला आरोग्य अधिकारी ठरत आहेत स्वच्छतेच्या खऱ्या दुर्गा!’

‘पर्यावरण संवर्धनापासून कचरा व्यवस्थापनापर्यंत; पिंपरीच्या महिला आरोग्य अधिकारी ठरत आहेत स्वच्छतेच्या खऱ्या दुर्गा!’

प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामकाज पाहणाऱ्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे शहर सुंदर आणि हरित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दुर्गा; महिला आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य मुकादम सांभाळत आहेत संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची धुरा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची नियमित स्वच्छता होणे अत्यंत आवश्यक असते. ही स्वच्छता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सफाई सेवकांचे नियोजन, कामावर देखरेख आणि विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य मुकादम अतिशय सक्षमपणे सांभाळत आहेत.
शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत स्नेहल सोनवणे, संतोषी कदम, स्नेहा चांदणे, स्नेहल सुकटे, कोमल फर्डे, रश्मी तुंडलवार, रुपाली साळवे या महिला आरोग्य निरीक्षक आणि महिला आरोग्य मुकादम प्रमिला शिंदे, शिवगंगा नागरगोजे, रुक्मिणी बिनवडे या मोलाची भूमिका बजावत आहेत.

शहरातील विविध भागांतील स्वच्छता कामांचे दैनंदिन नियोजन करणे, सफाई कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय साधणे आणि प्रत्यक्ष कामकाजावर बारीक लक्ष ठेवणे, अशा जबाबदाऱ्या या महिला अधिकारी पार पाडतात. स्वच्छतेविषयक उपक्रमांची अंमलबजावणी जमिनीवर दिसावी, यासाठी त्यांना सातत्याने मेहनत घ्यावी लागते. त्यांच्या याच दैनंदिन परिश्रमांमुळे पिंपरी-चिंचवडची स्वच्छता व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

शहराचा दर्जा उंचावणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि सार्वजनिक ठिकाणे चकाचक ठेवण्यासाठी आरोग्य निरीक्षक व मुकादम सफाई सेवकांच्या मदतीने विविध उपक्रम राबवतात. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. स्वच्छतेसोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन देणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करणे यात आरोग्य विभागाची भूमिका निर्णायक ठरत आहे.

 

“शहराची स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन, त्यांच्या कामावर नियमित देखरेख आणि नागरिकांशी समन्वय साधणे आवश्यक असते. स्वच्छ सर्वेक्षणातून स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासोबतच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी स्वच्छतेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला, तर शहर अधिक सुंदर बनविण्याचे ध्येय नक्की साध्य होईल.”
— स्नेहल सोनवणे, आरोग्य निरीक्षक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सहभागातून पिंपरी-चिंचवड अधिक स्वच्छ व हरित बनवणे हेच आमचे ध्येय आहे.”
— कोमल फर्डे, आरोग्य निरीक्षक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या या महिला खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवडच्या ‘स्वच्छतेच्या दुर्गा’ ठरत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!