27

विजयनगर काळेवाडीत पाणीप्रश्न पेटला; ८ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ विजयनगर काळेवाडी परिसरातील पाणीप्रश्न भयंकर बिकट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात अपुरा, अनियमित आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या या मूलभूत समस्येवर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक संतोष अंकुश कोकणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास महापालिका भवनावर ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
या संदर्भात नगरसेवक संतोष कोकणे यांनी पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदनाद्वारे परिस्थितीची जाणीव करून दिली.
नगरसेवक संतोष कोकणे हे प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे ज्येष्ठ व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. पाणी ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक गरज असल्याने ती वेळेवर आणि पुरेशा दाबाने मिळालीच पाहिजे, या भूमिकेवर कोकणे ठाम आहेत.
“पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने योग्य त्या तांत्रिक उपाययोजना करून काळेवाडी परिसराला दिलासा द्यावा,” अशी आग्रही मागणी कोकणे यांनी केली.
“प्रभाग क्र. २२ विजयनगर काळेवाडी आणि परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी हा मूलभूत अधिकार असून नागरिकांना त्यांचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पुढील आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महापालिका भवनावर भव्य हंडा मोर्चा काढला जाईल आणि प्रशासनाला जाब विचारला जाईल.”— संतोष अंकुश कोकणे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
