44

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात; संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्याधारित उपक्रम!
रपिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
रहाटणी: क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल (रहाटणी) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या दूरदृष्टी आणि संस्कारक्षम शैक्षणिक विचारसरणीतून अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप यांच्या शुभहस्ते भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन व पूजन करण्यात आले.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘राहुल मित्र मंडळ’चे अध्यक्ष शांताराम भालेराव, ‘नवयुग वितरक’चे विवेक छेडा, मिलिंद निसर्गगंध आणि विद्या भालेराव प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी रुजण्यावर नेहमीच भर दिला आहे. त्यांच्या याच प्रेरणेतून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महामानवांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली.
या प्रसंगी शिक्षिका निशा मॅडम यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगितले. त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनकार्याची आणि बौद्ध धर्माच्या मूलभूत शिकवणुकीची सविस्तर माहिती दिली.
भगवान बुद्धांनी दिलेला अहिंसा, स्वातंत्र्य, करुणा, बंधुता, न्याय आणि समानता हा सार्वकालिक संदेश दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या मनात उत्तम संस्कार रुजवून त्यांना सुजाण व संवेदनशील नागरिक बनवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट व सूत्रबद्ध संचालन श्वेता भालेराव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

