65

सरस्वती अनाथ आश्रमात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; समाज घडवण्यासाठी वाचनसंस्कृतीची गरज: सुनील पोकरे
सांगवी (पुणे) प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. १५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि आदरांजली वाहून झाली.
या प्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष देविदास सुरवसे, संचालिका छबूबाई सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे, शिक्षक महादेव गायकवाड, अतिपूननीस बॉम्बवाले, अधीक्षक सागर भोई आणि सहाय्यक दिनकर कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. इयत्ता ५ वी ते १० वीतील सुमारे २५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे म्हणाले, “पुस्तके ही माणसाची खरी मित्र आहेत. वाचनामुळे ज्ञानाची क्षितिजे रुंदावतात, विचारांना योग्य दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे तरुणाईत वाचनाची सवय कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत समाजात पुन्हा एकदा समृद्ध वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.”
तसेच, त्यांनी ‘मॅक्स मंथन न्यूज’च्या सामाजिक आणि पत्रकारितेतील कामगिरीचा गौरव केला. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात १४ एप्रिल २०२४ रोजी सुरू झालेल्या या वृत्तवाहिनीने अल्पावधीत जनसामान्यांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि नागरिकांच्या विविध समस्यांना निर्भीडपणे वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही वाहिनी करत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या सोहळ्यात विद्यार्थी रिहान शेख याने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासाची व प्रेरणादायी कार्याची माहिती मांडली. शिक्षक महादेव गायकवाड यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, “वाचन प्रेरणा दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित सोहळा न राहता प्रत्येक विद्यार्थ्याने वर्षभर वाचनाची सवय जोपासली पाहिजे. प्रत्येकाने किमान एक पुस्तक वाचावे, मित्रांना पुस्तके भेट द्यावीत आणि ग्रंथालयांचा जास्तीत जास्त वापर करावा.”
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार महादेव गायकवाड यांनी मानले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन दिनकर कांबळे आणि सागर भोई यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


