42

पिंपरी-चिंचवडमध्ये १७ ऑक्टोबरला ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद’; चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात देश-विदेशातील विचारवंत एकत्र येणार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: बौद्ध महिलांचा ऐतिहासिक प्रवास, वर्तमानातील स्थान आणि भविष्यातील सामाजिक-सांस्कृतिक वाटचाल यांवर सखोल विचारमंथन करण्यासाठी भारतासह श्रीलंका, व्हिएतनाम, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया येथील बौद्ध भिक्खुणी, विचारवंत, संशोधक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत. ‘विस्डम इन मोशन फोरम’ आणि ‘कॅटॅलिस्ट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद पुणे २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत चिंचवड येथील प्रो. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (सभागृह) येथे पार पडणार आहे.
‘बौद्ध महिलांचा प्रवास : प्रज्ञा, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तन’ ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. भगवान बुद्धांच्या भिक्खुणी संघाच्या प्राचीन परंपरेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांनी बौद्ध महिलांच्या जीवनात घडवलेल्या क्रांतीचा आढावा या परिषदेत घेतला जाईल.
याबाबत माहिती आयोजन समितीच्या अध्यक्षा व प्रसिद्ध भूलरोगतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला आंदुरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या हरिभक्त, वैद्यकीय नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे आणि पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक लक्ष्मीकांता माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि दलित स्त्रीवादी अभ्यासक प्रा. डॉ. विमल थोरात यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. मिलिंद महाविद्यालयाच्या प्रथम महिला प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान आणि कामगार सहआयुक्त शिरीन संजू लोखंडे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख वक्त्यांमध्ये प्रा. मनोरी पी. सेनानायके (विभागप्रमुख, कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका), डॉ. योजना भगत (माजी विभागप्रमुख, पाली व बौद्ध अध्ययन विभाग, मुंबई विद्यापीठ), डॉ. रुपाली मुन (संचालिका, नवयान बौद्ध चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, ऑस्ट्रेलिया), भिक्खुणी विसुद्धिपञ्ञा (संशोधक व भिक्खुणी, व्हिएतनाम), भिक्खुणी महाकासा (संशोधक व भिक्खुणी, कोरिया), डॉ. नीलम ओसवाल (मानसशास्त्रज्ञ व विपश्यना शिक्षिका, पुणे)
-
सत्र १: ‘बाबासाहेबांना अभिप्रेत समाजाभिमुख बौद्ध धम्म’ – सूत्रसंचालन डॉ. दीप्ती किरतकर, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, शल्यचिकित्सक डॉ. शिल्पा चौधरी (पाझारे – ऐतिहासिक १९४२ च्या परिषदेतील जाईबाई चौधरी यांच्या पणती) आणि सामाजिक नेत्या शिवांजली गायकवाड.
-
सत्र २: ‘२१ व्या शतकातील भिक्खुणी संघ : आव्हाने, पुनरुज्जीवन आणि पुढील वाटचाल’ – सूत्रसंचालन लक्ष्मीकांता माने, श्रीलंकेतील भिक्खुणी उप्पलवण्णा थेरी, तिबेटी बौद्ध भिक्खुणी द्रुपोन ग्याल्तेन साम्तेन (माजी अभिनेत्री बरखा मदान), अखिल भारतीय भिक्खुणी संघाच्या सचिव भंते सुनीती भिक्खुणी आणि भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना.
-
सत्र ३: ‘जयभीम २.० : तरुणाईतील वाढता जयभीम क्रेझ’ – सूत्रसंचालन ॲड. कोमल शिंदे, लेखिका मीनाक्षी इंगळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या डॉ. सांची कांबळे आणि बीबीसीच्या वार्ताहर छाया काविरे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ मध्ये नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स’ या ऐतिहासिक महिला परिषदेच्या वारशातून या उपक्रमाची प्रेरणा घेण्यात आली आहे. महिलांनी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत केवळ सहभागी न राहता नेतृत्वकर्त्याची भूमिका बजावावी, यासाठी हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ अत्यंत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
