
स्वच्छतेत पिंपरी-चिंचवडचा डंका! राज्यात पहिला क्रमांक पटकावत पटकावला राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ऐतिहासिक कामगिरी करत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील सर्वाधिक स्वच्छ शहर होण्याचा हा बहुमान मिळवत महापालिकेने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा राष्ट्रीय सन्मान स्वीकारला. या सोहळ्याला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल, केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, विभागाचे सचिव सतेंद्र सिंह, सचिव डी. थारा यांच्यासह केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या यशामुळे पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.

शहराचा स्वच्छता निर्देशांक उंचावण्यासाठी प्रशासनाने केवळ यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांच्या दैनंदिन सवयींमध्ये स्वच्छतेची शिस्त रुजवण्यावर विशेष भर दिला. घरातूनच ओला व सुका कचरा वेगळा करणे (उगमस्थानी विलगीकरण), त्याचे नियमित संकलन आणि शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्वापर (RRR संकल्पना) यावर भर देण्यात आला. आरोग्य विभागासोबतच जलनिस्सारण, पाणीपुरवठा, स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आणि उद्यान विभागांनी एकत्रित समन्वयाने काम करत शहराचा चेहरामोहरा बदलला.

या यशामागे प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्या सफाई सेवकांचे योगदान सर्वात मोलाचे ठरले आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समर्पित वृत्तीमुळेच हा राष्ट्रीय सन्मान शक्य झाला. तसेच, गृहनिर्माण संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनीही यात मोलाची साथ दिली.
“हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. सफाई सेवकांचे कष्ट आणि नागरिकांची सक्रिय साथ यामुळेच हा मान मिळाला असून, भविष्यातही शहराचे हे अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” – महापौर रवि लांडगे
“राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला हा सन्मान महापालिका यंत्रणा, सफाई कर्मचारी आणि प्रत्येक सुजाण नागरिकाच्या कष्टांची पोचपावती आहे. स्वच्छता ही केवळ सेवा न राहता ती पिंपरी-चिंचवडकरांची जीवनशैली बनली आहे. शहराला देशासाठी आदर्श ठरविण्याचा आमचा प्रयत्न निरंतर सुरू राहील.” – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
“अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई सेवकांच्या मेहनतीमुळेच स्वच्छतेतील हे बदल प्रत्यक्ष जमिनीवर उतरले. हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या श्रमाचा खरा सन्मान आहे.” – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम
“कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, वेळेत संकलन आणि व्यापक जनजागृती यांवर आरोग्य विभागाने सातत्याने लक्ष केंद्रित केले. त्याला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच हे यश साकार झाले.” – उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
