
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना यशवंतनगर एसआरए प्रकल्पात हक्काचे घर; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने मोफत सदनिका वाटपाचे आदेश!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी निवाऱ्याचा आधार देणारा अत्यंत संवेदनशील निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना पिंपरीतील यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सदनिका मोफत वाटप करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.

५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या मान्यताप्राप्त प्रस्तावानुसार, एकूण ९ पैकी ८ मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना तात्काळ सदनिकांचे वाटप होणार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे संकटात सापडलेल्या या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

मोफत सदनिका मिळणाऱ्या ८ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची नावे खालीलप्रमाणे
१. दिवंगत राहुल धोंडिबा गायकवाड यांच्या पत्नी अश्विनी राहुल गायकवाड
२. दिवंगत महेश सुरेश कुंभार यांच्या पत्नी शिवुबाई महेश कुंभार
३. दिवंगत अक्षय राजू सावंत यांच्या पत्नी हर्षदा सुरेश बने
४. दिवंगत वामन दगडू कसबे यांच्या पत्नी सुनीता वामन कसबे
५. दिवंगत सनी अशोक माने यांच्या पत्नी कांचन सनी माने
६. दिवंगत सुनील भारत कोरके यांच्या पत्नी पल्लवी सुनील कोरके
७. दिवंगत भावेश मोहन वाणी यांच्या पत्नी मोहिनी भावेश वाणी
८. दिवंगत रणजित जयवंत पाटील यांच्या आई छाया जयवंत पाटील
दुर्घटनेतील नववे मृत कर्मचारी नागेश गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांकडून अद्याप आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. संबंधितांकडून कागदपत्रे सादर होताच त्यांनाही सदनिका वाटप करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर महापालिका सभेने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार यापूर्वीच सर्व वारसांना ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानंतर २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या महापालिका सभेच्या ठरावानुसार मोफत सदनिका देण्यास मान्यता मिळाली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने वेगवान हालचाली करत यशवंतनगर एसआरए प्रकल्पात या सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
या निर्णयाबाबत बोलताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, “मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची महापालिका प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. आर्थिक मदतीसोबतच हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका संवेदनशील असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले की, “दुर्घटनेतील ९ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका देण्यात येणार आहेत. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या वारसांकडून कागदपत्रांची पूर्तता बाकी असल्याने सध्या ८ सदनिका वाटपाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यशवंतनगर येथील एसआरए प्रकल्पात या सदनिका उपलब्ध करून दिल्या असून, संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
