
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय: २४ तासांत दाखल गुन्ह्यांची धक्कादायक आकडेवारी जाहीर; मारामारी, अपघात व चोऱ्यांच्या घटनांनी शहर ढवळले!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रांतर्गत दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रोजच्या २४ तासांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांची माहिती समोर आली आहे. यामध्ये जुन्या वादातून मारहाण, कोयत्याचा वापर, भीषण अपघातामुळे झालेला मृत्यू, शासकीय बस अडवून चालकाला मारहाण आणि वाहन चोरीच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आयुक्तालय क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने एकाच दिवशी दाखल झालेले हे गुन्हे खळबळजनक ठरले आहेत.

१. चिंचवड पोलीस ठाणे (गु.र.नं. ६८६/२०२६):

जुनी २० हजार रुपयांची देवाणघेवाण आणि वादाच्या कारणावरून वाल्लेकरवाडी रोडवरील रानजाई हॉटेलजवळ मयूर मधु लोंढे या युवकाला कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच त्याच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी अनिलसिंग बच्चनसिंग टाक व इतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. निगडी पोलीस ठाणे (गु.र.नं. १०२०/२०२६):
दत्तवाडी आकुर्डी आणि दळवीनगर परिसरात लहान मुलांच्या सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ओम अनिल जाधव यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने बेदम मारहाण करत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली.
३. दिघी पोलीस ठाणे (गु.र.नं. ८२१/२०२६):
गायकवाडनगर येथे दिवाळीचा फराळ देण्यासाठी गेलेल्या बहीण-भावावर घरच्यांनीच हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली. आरोपी भावाने घरत प्रवेश करून शिवीगाळ करत मोठ्या बहिणीला आणि फिर्यादीला बेस बॉल स्टीकने मारहाण करून जखमी केले.
४. तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे (गु.र.नं. ५१४/२०२६):
महालक्ष्मी नर्सरी चौकात बसलेल्या ७१ वर्षीय वृद्धाला, बहिणीला खर्चासाठी पैसे न पाठवण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. आरोपींनी काठीने व बुक्क्यांनी मारहाण करत वृद्धाला जखमी केले.
५. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे (गु.र.नं. ९०६/२०२६):
मोशी येथील वाघजाई पेट्रोल पंपसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारच्या धडकेत ७५ वर्षीय पायी जाणारे वृद्ध भगवान धनसिंग बनसोड यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
६. पिंपरी पोलीस ठाणे (गु.र.नं. १०२४/२०२६):
पुणे-मुंबई महामार्गावर प्रीस्टन कन्ट्रक्शनसमोर भरधाव व हयगयीने चालवलेल्या अज्ञात मोटरसायकल चालकाच्या धडकेत रस्ता ओलांडणारे किशोर विश्वभर दयाळ बन्सल गंभीर जखमी झाले.
७. चाकण दक्षिण पोलीस ठाणे (गु.र.नं. ३३९/२०२६):
पुणे ते नाशिक जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ‘जलशिवनेरी’ बस मुटकेवाडी सिग्नल चौकात अडवून बसचा दरवाजा उघडून चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.
८. तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे (गु.र.नं. ५१२/२०२६):
सोमाटणे खिंड परिसरात रोडच्या कडेला चावीसह उभी केलेली ५०,०००/- रुपये किमतीची हिरो एच.एफ. डिलक्स मोटारसायकल (MH 24 CG 5584) अज्ञात चोरट्यांनी लांबवली.
पोलिसांकडून या सर्व प्रकरणांचा कसून तपास सुरू असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, तसेच कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव
