
पर्यावरणवादी सोनम वांगचुक दाम्पत्य अमरावती दौऱ्यावर; १० हजार विद्यार्थ्यांशी साधणार संवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार अनावरण!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: पर्यावरण संवर्धन, विज्ञान आणि नावीन्यपूर्ण शिक्षण क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे देशभरात विशेष ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे त्यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांच्यासह अमरावती दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या आगमनामुळे शहरातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः युवा वर्गामध्ये प्रचंड उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दौऱ्यात वांगचुक तब्बल १० हजार विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून, त्यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्ती राजेश अर्जुन यांनी एका पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महादेवखोरी रोडवरील उत्तम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात हा भव्य अनावरण सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्ती राजेश अर्जुन राहणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विपश्यनाचार्य डॉ. कमल गवई, रिपब्लिकन पार्टीचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई, गीतांजली वांगचुक आणि ट्रस्टचे उपाध्यक्ष धरम अर्जुन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

सोनम वांगचुक हे केवळ पर्यावरणवादी आणि वैज्ञानिक म्हणूनच नव्हे, तर शिक्षणातील क्रांतिकारी प्रयोग आणि सामाजिक प्रश्नांवरील ठाम भूमिकेमुळे तरुणाईमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. लडाखच्या पर्यावरणीय आणि घटनात्मक हक्कांसाठी त्यांनी उभारलेले आंदोलन आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथील त्यांच्या उपोषणाला देशभरातील युवा वर्गातून मोठा पाठिंबा मिळाला होता. तसेच, त्यांच्याच जीवनकार्यावर प्रेरित असलेल्या ‘थ्री इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटातील अभिनेता आमिर खानने साकारलेल्या ‘फुन्सुख वांगडू’ या व्यक्तिरेखेमुळे त्यांचे नाव घराघरांत पोहोचले आहे.
सोनम वांगचुक यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्ती राजेश अर्जुन, सचिव प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, प्रशासकीय अधिकारी डॉ. सचिन पंडित आणि डॉ. प्रितेश पाटील यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
