
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन!
पिंपरी/ मुंबई प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: महाराष्ट्राच्या पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ या हंगामासाठी प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ (Blue Flag) प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग ज्युरीने (International Blue Flag Jury) या तिन्ही किनाऱ्यांची पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, जैवविविधतेचे रक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या कडक निकषांवर तपासणी करून हा गौरव जाहीर केला आहे.

राज्य पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६-२७ या हंगामासाठी संपूर्ण भारतातील एकूण २२ समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ मान्यता मिळाली आहे. यामध्ये १३ किनाऱ्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून ९ नवीन किनाऱ्यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, या ९ नवीन किनाऱ्यांपैकी तब्बल ३ किनारे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांवर येत्या १५ नोव्हेंबर २०२६ पासून ‘ब्लू फ्लॅग’ हंगामाला अधिकृत सुरुवात होणार आहे. या सन्मानाचे अधिकृत ध्वज नेदरलँडमधून आणले जात असून ते राज्य पर्यावरण आणि हवामान बदल विभागाकडे सुपूर्द केले जातील. संबंधित जिल्हा प्रशासनांच्या समन्वयाने या किनाऱ्यांवर भव्य ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी असून यामुळे महाराष्ट्राच्या वैभवात मोठी भर पडली आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार हा राज्याच्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जागतिक पातळीवर घेतलेली दखल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार पर्यावरणाचे रक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्यासाठी कटिबद्ध आहे.”
या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर एक नवी ओळख मिळणार असून, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील इतर पात्र समुद्रकिनाऱ्यांवरही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि व्यवस्थापन प्रणाली विकसित करून ‘ब्लू फ्लॅग’ कार्यक्रमाचा विस्तार करण्याचे नियोजन पर्यावरण विभागाने केले आहे. पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, बीच मॅनेजमेंट कमिटी आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश साकार झाले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
