भाजपचे शहर मध्यवर्ती कार्यालय ठरणार जनसेवेचे शक्तिकेंद्र; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालय हे केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचे ठिकाण न राहता, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणारे, कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारे आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करणारे प्रभावी केंद्र ठरले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांच्या समर्पणात आणि जनतेच्या विश्वासात असून, नव्या कार्यालयाच्या माध्यमातून संघटन अधिक सक्षम करत नागरिकांशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने या कार्यालयात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मोरवाडीतील शहर मध्यवर्ती कार्यालयात पक्षाच्या वाढत्या संघटनात्मक गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशस्त कॉन्फरन्स हॉल , डिजिटल मीडिया कक्ष , पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आधुनिक केबिन , ग्रंथालय , पक्षाच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा या सुविधांमुळे शहरातील विविध मंडल, मोर्चे, आघाड्या आणि प्रकोष्ठ यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण उपक्रम आणि जनसंपर्क मोहिमा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने राबविता येणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटणी, वैशाली खाड्ये, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, सदाशिव खाडे, अनुप मोरे, राजेश पिल्ले, तेजस्विनी दुर्गे, शितल शिंदे, हेमचंद्र उर्फ राजु मासूळकर, नवनाथ ढवळे, अभिजित बोरसे यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष, विविध मोर्चे व आघाड्यांचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्योंक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले, प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी तर आभार विकास डोळस यांनी मानले.
“भारतीय जनता पार्टीसाठी कार्यालय म्हणजे केवळ विटा-सिमेंटची वास्तू नाही, तर कार्यकर्त्यांच्या विचारांना दिशा देणारे आणि समाजसेवेचा संकल्प मजबूत करणारे केंद्र आहे. हे कार्यालय सत्तेचे नव्हे, तर सेवेचे केंद्र बनले पाहिजे.” – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
“कार्यकर्त्यांना हक्काचे आणि सुविधांनी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शहर मध्यवर्ती कार्यालयाचे आधुनिकीकरण केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा संघटन अधिक मजबूत आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” – शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


