पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी अनाथ आश्रमात; आकाश कंदिल व दिव्यांच्या विक्रीतून जमलेला निधी आणि साहित्याची भेट!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (PCCOER) महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा, संवेदनशीलता आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. अॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागांतर्गत ‘एफइएसए’ (FESA) आणि ‘लाईफ स्किल्स सेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने “दीपोत्सव” हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या कलाकुसरीच्या साहित्यातून जमा झालेला निधी आणि आवश्यक वस्तू अनाथ व दिव्यांग संस्थांना सुपूर्द करत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा वापर करत सुंदर आकाश कंदिल आणि हाताने रंगवलेले मातीचे दिवे तयार केले होते. या वस्तूंच्या विक्रीतून जमा झालेला संपूर्ण निधी पिंपरी-चिंचवडमधील संत मोणी बाबा अनाथ आश्रम आणि झुंज दिव्यांग संस्था यांना दिवाळी भेट म्हणून देण्यात आला. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर महाविद्यालयाच्या वतीने आश्रमातील मुलांना धान्य, किराणा साहित्य, मिठाई आणि इतर आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमादरम्यान पीसीसीओईआरचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी संत मोणी बाबा अनाथ आश्रम व झुंज दिव्यांग संस्थेला प्रत्यक्ष भेट दिली. तिथे त्यांनी आश्रमातील लहान मुलांसोबत विविध खेळ खेळत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील सहभागामुळे उपस्थितांचे मन भरून आले.
या संपूर्ण उपक्रमात पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, प्रा. वैशाली निंबाळकर, प्रा. रूपाली पाटील, प्रा. गजानन जाधव, प्रा. राजेश पाटील यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ तावरे, संस्कृती बिरादार, निमिष कदम, सार्थक आटोळे, कुणाल तायडे, अथिला पाटील, संजना गाडगे, समृद्धी लांडे आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) वतीने राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेन्द्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जातील, असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
