भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय — स्वामी गोविंद देव गिरी महाराज
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: भारतीय परंपरेत सूर्योपासनेला अत्यंत महत्त्व असून, आपल्या माता-भगिनींनी आपली प्राचीन भारतीय संस्कृती उत्तम प्रकारे जपली आहे. माता-भगिनींच्या देवावरील अढळ श्रद्धा आणि त्यांच्यात रुजलेली मूल्ये अतुलनीय आहेत. याच सद्गुणांमुळे यशस्वी कुटुंब आणि समाज घडतो. देवी सीता आणि सावित्री या आपल्या आदर्श असून, अशा श्रद्धावान माता-भगिनींचे दर्शन घेणे म्हणजे पुण्य मिळवण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे विश्वस्त स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी काढले.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) मोशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर भव्य छटपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या हस्ते अत्यंत दिमाखात भव्य गंगा आरती संपन्न झाली. विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. या धार्मिक सोहळ्यास स्वामी भरतानंद महाराज, आचार्य देशपांडे, नगरसेवक यश साने, कुंदन गायकवाड आणि निखिल बोराटे यांच्यासह सुमारे १५ हजार उत्तर भारतीय बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवित्र तीर्थक्षेत्र काशी येथून विशेष रूपने आलेल्या पुरोहितांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य गंगा आरतीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. इंद्रायणीच्या काठावर सर्वांनी मिळून छठ मातेची पूजा व प्रार्थना केली. या वेळी छठ मातेच्या भक्तीगीतांनी आणि महिलांच्या पारंपरिक छठ गीतांनी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.
या महोत्सवा दरम्यान, विश्व श्रीराम सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश डॉ. लालबाबू गुप्ता यांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराजांकडे सूपूर्द केला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुढे म्हणाले की, “संत ज्ञानेश्वर माऊली याच पवित्र इंद्रायणी तीरावर आळंदीमध्ये समाधीस्थ आहेत. माऊली म्हणजेच आई होय. आपण सर्वजण भारत मातेचे पुत्र आहोत. देशातील आपल्या माता कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी निष्ठेने छठ मातेची पूजा करतात. या सर्व माता-भगिनींना मी वंदन करतो. आपण अशीच भारतमातेची सेवा आणि देशाची प्रगती अविरत सुरू ठेवूया. छठ माता तुम्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो,” असा आशीर्वाद त्यांनी दिला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


