पिंपरी, दि. २५ एप्रिल, २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने लोकसेवा हक्क दिन (२८ एप्रिल) आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्तीनिमित्त शहरातील झोपडपट्टी आणि बचत गटांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमांतर्गत समूह संघटकांच्या माध्यमातून बैठका आणि मेळावे घेण्यात आले, अशी माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.

या उपक्रमात समाज विकास विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्या सेवा हक्कांबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे.
या मोहिमेत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह इतर कार्यालयांमध्ये अधिकारी वर्गाला सेवा हक्काची शपथ देण्यात आली. आरोग्य विभागाच्या आयईसी टीमने शहरातील गर्दीची ठिकाणे, पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांवर सेवा हक्क नियमांचे फलक लावून जनजागृती केली. शहराच्या विविध भागात पथनाट्यांच्या माध्यमातून सेवा हक्काची माहिती देण्यात आली, तर समाज विकास विभागाने झोपडपट्टी आणि बचत गटांमध्ये विशेष मेळावे व बैठका आयोजित करून नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची सविस्तर माहिती दिली.
या बैठकांमध्ये झोपडपट्टीतील रहिवाशांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि त्यांचे हक्क याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना कोणत्या सेवा मिळतात, त्यांचे हक्क काय आहेत आणि सेवा मिळण्यास अडथळा आल्यास तक्रार निवारणासाठी कोणती प्रक्रिया उपलब्ध आहे, याची सखोल माहिती यावेळी देण्यात आली.

या उपक्रमाबद्दल बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “लोकसेवा हक्क दिनानिमित्त समाज विकास विभागाने झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये त्यांच्या सेवा आणि हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये लोकशाही हक्कांबाबत अधिक जागृती होईल.”
सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी सांगितले की, “या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सेवा हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे हा आहे. समाज विकास विभागामार्फत या प्रकारचे उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबवले जातील. शहरातील नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन आपले हक्क समजून घ्यावेत.”
