अकोला/मूर्तिजापूर. प्रतिनिधी:- विलास सावळे
जिल्हा परिषद शाळा सालतवाडा येथे मुख्याध्यापक सावळेसर यांच्या केंद्रप्रमुखपदी लाखपुरी येथे झालेल्या पदोन्नतीनिमित्त तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा एकत्रित सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा आणि गावकरी मंडळी यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शाळा समितीच्या अध्यक्षा करिश्माताई शिराळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सिमाताई जामनिक, उपसरपंच मोहनभाऊ मानकर, पत्रकार देवानंदभाऊ जामनिक, ग्रा.प. सदस्या रेखाताई नागे, प्रदिपभाऊ वानखडे, चंदुभाऊ वानखडे, नाग़रावजी वानखडे आणि मधुकरराव चहाकार उपस्थित होते. सत्कारमूर्ती सावळेसर यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थी आणि गावकरी यांच्यात उत्तम समन्वय साधून मुख्याध्यापकपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून हा निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी सावळेसरांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सावळेसर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या शाळेने आणि गावाने त्यांना खूप सहकार्य केले आणि ते या ऋणानुबंधाला कधीही विसरू शकणार नाहीत, असे भावोद्गार काढताना ते भावुक झाले होते.
या सोहळ्यात गावच्या सरपंच सिमाताई जामनिक, उपसरपंच मोहनभाऊ मानकर आणि चंदुभाऊ वानखडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षवेध व महाराष्ट्र रत्न गुणगौरव पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल, तसेच गजानन चव्हाण यांना सामाजिक प्रेरणा पुरस्कार व डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२५ मिळाल्याबद्दल सावळेसरांनी शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. मंगलाताई गावंडे, सुजाताताई भटकर, ज्योतीताई अरज आणि श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा यांच्या वतीनेही सावळेसरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक सारसेसर, वर्घट मॅडम, शाळा समिती उपाध्यक्ष अरुण वानखडे, साहील गावंडे, जानरावजी खंडारे भगोरा, रुखमाताई वानखडे, संदिप नेसनेसकर, शिवम अरज आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कु. प्रणीता ऊ. वानखडे या सातवीच्या विद्यार्थिनीने शाळेला एक सुंदर पूजेचे ताट भेट दिले. विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना नाश्ता व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊतसर यांनी केले, प्रास्ताविक डोंगरदिवेसर यांनी केले आणि आभार प्रदर्शन सारसेसर यांनी केले. जि.प. शाळेत अशा प्रकारचा आगळावेगळा निरोप व सत्कार समारंभ पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता आणि यासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.