अकोला/मूर्तिजापूर: जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे गावात एका लग्नाच्या वरातीदरम्यान दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरातीत वाजणाऱ्या डीजेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर राजकीय संघर्षात झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.

मिळालेल्या माहितीनुसार, धोत्रा शिंदे येथे एका घरासमोरून लग्नाची वरात जात असताना डीजेचा विद्युत सर्व्हिस लाईनला स्पर्श होईल, या कारणावरून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही क्षणातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त जमावाने चक्क लग्नाच्या वरातीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले.
या घटनेनंतर तणाव वाढला आणि रात्री उशिरा हा वाद मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. येथे भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने आणखी वाद निर्माण झाला.

या हाणामारीत वरातीतील ४ ते ५ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे धोत्रा शिंदे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. डीजेवरून सुरू झालेल्या वादाने राजकीय स्वरूप घेतल्यामुळे या घटनेला अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
– विलास सावळे, मूर्तिजापूर – अकोला
